जवळचे मित्र असले तरी अत्याचार हा अन्याय्यच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुंबई - एखाद्या महिलेला जवळचे अनेक मित्र असले, तरी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा अधिकार पुरुषांना मिळतो असा त्याचा अर्थ नाही. नकार देण्याचा अधिकार तिलाही आहे, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाच्या एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी दिला.

मुंबई - एखाद्या महिलेला जवळचे अनेक मित्र असले, तरी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा अधिकार पुरुषांना मिळतो असा त्याचा अर्थ नाही. नकार देण्याचा अधिकार तिलाही आहे, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाच्या एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी दिला.

अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर न्या. ए. एम. बदर यांच्यापुढे नुकतीच सुनावणी झाली. पुतणीचे जवळचे दोन मित्र असून, त्यांच्याबरोबर तिचे शारीरिक संबंध आहेत, असा अजब दावा आरोपीने जामिनासाठी केलेल्या अर्जात केला होता; मात्र न्या. बदर यांनी हा दावा सपशेल नाकारला. महिलांना साध्य करणे सोपे वाटत असले, तरी त्यांचा कुणीही अकारण वापर करून घेता कामा नये. त्या महिलांनाही नकार देण्याचा अधिकार आहे, असे न्या. बदर यांनी निकालात स्पष्ट केले आहे. पीडित मुलीला जवळचे दोन मित्र असले, तरी तिचा शारीरिक गैरफायदा घेण्याचा कोणताही अधिकार अर्जदाराला मिळत नाही, असे न्यायालयाने सुनावले.

आरोपीला नाशिक सत्र न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात त्याने अपील केले असून, जामिनासाठी अर्ज केला आहे. पीडित मुलीने याबाबत लगेच तक्रार दाखल केली नाही आणि याबाबत कुणाला काही सांगितले नाही. आता ती आश्रमशाळेत आहे. त्यामुळे या तक्रारीत तथ्य नाही, असा बचाव आरोपीने केला होता. घरात माझ्याशिवाय कमावणारा कुणीही नाही, त्यामुळे जामीन मंजूर करून शिक्षा निलंबित करावी, अशी मागणी अर्जदाराने केली होती; मात्र न्यायालयाने ही मागणी अमान्य केली.

Web Title: mumbai news crime court