पोलिसाला मारहाण करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

मुंबई - मोटारसायकलस्वाराला चौकशीकरिता पोलिस ठाण्यात नेताना त्याने पोलिसाला मारहाण केली. हा प्रकार बुधवारी वांद्रे परिसरात घडला.

मुंबई - मोटारसायकलस्वाराला चौकशीकरिता पोलिस ठाण्यात नेताना त्याने पोलिसाला मारहाण केली. हा प्रकार बुधवारी वांद्रे परिसरात घडला.
खेरवाडी पोलिस ठाण्याचे शिपाई इंद्रजित सुभाष कांबळे बुधवारी सायंकाळी वांद्रे रेल्वे पुलाजवळ गस्तीवर होते. तेव्हा रेल्वे पुलाजवळ मोहंमद ईजाज हरून शेख हा ऍक्‍टिवा स्कूटरने स्प्लेंडर मोटारसायकलला "टो' करून नेते होता. हा प्रकार पाहताच कांबळे यांनी स्प्लेंडर मोटारसायकलस्वाराला हटकले. त्यांना मोटारसायकलची नंबर प्लेट संशयास्पद वाटली. त्यांनी त्याच्याकडे कागदपत्रे मागितली. त्याने मोटारसायकल दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये नेत असल्याचे कांबळे यांना सांगितले. दरम्यान, मोहंमदने कांबळे यांच्याशी वाद घातला. त्यामुळे कांबळे यांनी त्याला मोटारसायकलवर बसवले आणि चौकशीसाठी पोलिस ठाण्याकडे निघाले.

त्याचवेळी मोहंमदने चालत्या मोटारसायकलवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. कांबळे यांनी पाठलाग करून त्याला पकडले असता मोहंमदने त्यांना मारहाण केली. कांबळे यांनी पोलिसांची मदत मागितली. हा प्रकार नागरिक पाहत उभे होते. काही वेळेत पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी मोहंमदला अटक केली. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: mumbai news crime in mumbai