वरुण धवनला सेल्फी महागात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

मुंबई - चाहत्यांसाठी मोटारीमधून डोकावून सेल्फी काढणारा अभिनेता वरुण धवन अडचणीत सापडला आहे. मुंबई पोलिसांनी गुरुवारी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. एवढ्यावरच पोलिस थांबले नाहीत, तर ट्‌विट करून प्रथितयश व्यक्तीकडून अशी अपेक्षा नसल्याचेही खडे बोल सुनावले आहेत. वरुणने पोलिसांच्या या पवित्र्यानंतर माफी मागितली आहे.

वैयक्तिक कामासाठी निघालेला वरुण शहरातील वाहतूक कोंडीत बुधवारी अडकला. त्या वेळी शेजारी असलेल्या रिक्षात बसलेल्या तरुणीने वरुणकडे एका सेल्फीची इच्छा व्यक्त केली. वरुणने प्रतिसाद देत कारच्या खिडकीतून डोकावत तरुणीसोबत सेल्फी काढला. हे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ते ट्‌विट केले. "साहसे रुपेरी पडद्यावर चालतील, पण मुंबईतील रस्त्यावर नाही... तुम्ही तुमचा जीव धोक्‍यात घातलात... त्याचबरोबर तुमच्या चाहत्यांचा आणि अन्य प्रवाशांचाही जीव धोक्‍यात घातला... जबाबदार मुंबईकर व तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या तुमच्याकडून चांगल्या वर्तवणुकीची अपेक्षा करतो. तुम्हाला लवकरच ई-चलन मिळेल, पुढच्या वेळी आम्ही यापेक्षा कठोर होऊ,' अशा शब्दांत पोलिसांनी त्याला खडसावले आहे.

सात हजारपेक्षा अधिक रिट्‌विट
मुंबई पोलिसांच्या ट्‌विटनंतर वरुणने पोलिसांची माफी मागितली आहे. असा प्रकार पुन्हा होणार नाही, अशी हमी सुद्धा दिली. पोलिसांचे खडे बोल आणि वरुणच्या माफीनाम्यानंतर हा विषय थांबला नाही. सोशल मीडियावर तो गुरुवारी चर्चेत होता. मुंबई पोलिसांच्या या ट्‌विटला सातहजार पेक्षा अधिक रिट्‌विट झाले आहेत. वरुणच्या माफीचे ट्विट अडीच हजार जणांनी रिट्‌विट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news crime on varun dhawan