पोलिस अधिकाऱ्याला मारहाण करणारा आणखी एक अटकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

मुंबई - गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आणखी एकाला सोमवारी (ता. 5) अटक करण्यात आली. हेमंत प्रमोद देसाई असे त्याचे नाव आहे. त्याने पोलिस उपनिरीक्षकाला चाकूचा धाक दाखवून पळ काढला होता.

मुंबई - गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आणखी एकाला सोमवारी (ता. 5) अटक करण्यात आली. हेमंत प्रमोद देसाई असे त्याचे नाव आहे. त्याने पोलिस उपनिरीक्षकाला चाकूचा धाक दाखवून पळ काढला होता.

सांताक्रुझ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक वसीम शेख रविवारी (ता. 4) पहाटे गस्तीवर होते. त्यांना स्वामी विवेकानंद रोडवर एका मोटरसायकलवरील दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांनी महिलेची सोनसाखळी चोरून पळ काढला होता. शेख यांनी त्यांना थांबवले असता, त्यांच्यापैकी श्रीनिवास गायकवाड याने त्यांना मारहाण केली. मारहाणीत शेख यांच्या कानाच्या पडद्याला जबर इजा झाली, तर हेमंतने शेख यांना चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेतही शेख यांनी श्रीनिवासला पकडून ठेवले आणि बीट मार्शलला कॉल केला. काही वेळात बीट मार्शल आले. श्रीनिवासला ताब्यात घेत असताना हेमंत पळून गेला. त्याला शोधण्यासाठी सांताक्रुझ पोलिसांनी पथक तयार केले होते. त्याला सोमवारी कांदिवली येथे अटक करण्यात आली.

सोनसाखळी चोरीकरता वापरलेली मोटरसायकलही चोरीची असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. हेमंतविरोधात चारकोप आणि कांदिवली पोलिस ठाण्यात 10 गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने हेमंतला शुक्रवार (ता. 9)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: mumbai news criminal arrested