1 जुलैपासून सीएसटी, ठाणे, एलटीटी कॅशलेस 

सुशांत मोरे
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई -  केंद्र सरकारकडून नोटाबंदीनंतर नागरिकांना कॅशलेस होण्यास सांगण्यास आले होते; मात्र यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची पुरेशी सोय नसल्याने रेल्वे खात्यासह इतर शासकीय कार्यालयांकडून पुढाकार घेण्यात आला नव्हता. आता सहा महिन्यांनंतर का होईना सीएसटी, ठाणे आणि एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनस) स्थानकात कॅशलेस व्यवहार करण्यासंदर्भात रेल्वेने तयारी पूर्ण केली आहे. 1 जुलैपासून डेबिट, क्रेडिट कार्ड स्वाईप मशीनबरोबरच पेटीएमच्या पर्यायाद्वारे पैसे देऊन सेवा घेता येणार असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

काळ्या पैशाला लगाम लावण्याच्या हेतूने केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या या निर्णयामुळे चांगलीच धांदल उडाली. नवीन नोटा छपाईच्या कामास विलंब होत असल्याने कॅशलेस व्यवहारावर केंद्र सरकारकडून भर देण्यात आला. त्यासाठी प्रथम रेल्वेत अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. मॉल, सिनेमा हॉल, थिएटर आणि अन्य काही ठिकाणी ग्राहकांकडून पैसे अदा करताना पीओएस मशीनचा (पॉईंट ऑन सेल) मशीनचा वापर केला जातो. त्यानुसार रेल्वेने तिकिटांच्या व्यवहारासाठी पीओएस मशीन बसवण्याचा निर्णय घेतला आणि टप्प्याटप्प्यात त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. 

मुंबई उपनगरी रेल्वेच्या काही स्थानकांवरही हा पर्याय प्रवाशांना देण्यात येत आहे. यातील सीएसटी, ठाणे आणि एलटीटी स्थानकांतही काही प्रमाणात पीओएस मशीन बसवण्यात आल्या आहेत; मात्र मध्य रेल्वे यावरच न थांबता ही तिन्ही स्थानके कॅशलेस कशी होतील, यावर भर दिला आहे. तिकीट खिडक्‍यांबरोबरच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, पे ऍण्ड पार्क, बुक स्टॉल्स, प्रसाधनगृह अशा रेल्वेच्या असणाऱ्या सुविधांवरही पीओएस मशीन बसवण्याचे काम सुरू आहे, तर मोबाईलवरील पेटीएमचाही पर्याय देण्यात येत आहे. या तीनही स्थानकांतील पीओएस आणि पेटीएमचे काम काही प्रमाणात बाकी आहे. ही कामे 30 जूनपर्यंत पूर्ण करून 1 जुलैपासून तिन्ही स्थानके कॅशलेस व्यवहारासाठी प्रवाशांना उपलब्ध केली जातील; मात्र प्रवाशांना हा व्यवहार करण्यासाठी कोणतीही सक्‍ती केली जाणार नाही. ते रोख व्यवहारही करू शकतात; परंतु त्यांनी कॅशलेसवर भर द्यावा एवढीच आशा असेल, असे मत अधिकाऱ्यांकडून व्यक्‍त करण्यात आले. 

Web Title: mumbai news CST, Thane, LTT Cashless