सायबर गुन्ह्यात ४२% वाढ

सायबर गुन्ह्यात ४२% वाढ

मुंबई - सामान्य नागरिक बळी पडणाऱ्या क्रेडिट व डेबिट कार्डच्या गुन्ह्यांमध्ये वर्षभरात ४२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. गुन्हे नोंदणीच्या प्रमाणात दरवर्षी वाढ होत असली, तरी गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण ७ टक्‍क्‍यांनी घटले आहे. 

२०१७ मध्ये मुंबई पोलिसांनी डेबिट व क्रेडिट कार्ड फसवणुकीसंबंधित ६०६ गुन्हे दाखल केले होते. २०१६ मध्ये मुंबईत क्रेडिट व डेबिट कार्डशी संबंधित ४२३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्याची तुलना केल्यास एका वर्षात गुन्हा दाखल होण्याच्या प्रमाणात ४२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 

याउलट २०१७ मध्ये केवळ ४२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. त्या तुलनेत २०१६ मध्ये मुंबईत दाखल गुन्ह्यांमधील ५४ गुन्ह्यांचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आले होते. याची तुलना केली तर २०१६ डेबिट व क्रेडिट कार्ड फसवणुकीसंबंधित गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण १६ टक्के होते, २०१७ ला ते सात टक्‍क्‍यांवर आले आहे. 

सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यातील दर्शनी भागात सायबर गुन्हे तपास व प्रतिबंध कक्ष तयार करण्यात आला आहे. या नवीन उपक्रमामुळे सायबर गुन्ह्यांची उकल व गुन्हे सिद्ध होण्याच्या प्रमाणात वाढ होईल, असा विश्वास पोलिसांना वाटतोय.

विशेष कक्ष सुरू 
सायबर गुन्ह्यांशी दोन हात करण्यासाठी मुंबई पोलिसांनीही गतवर्षी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आखल्या आहेत. त्याअंतर्गत ४ डिसेंबरपासून मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर गुन्हे तपास व प्रतिबंध कक्ष सुरू केले आहेत. कक्षात एक पोलिस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी व तीन ते चार पोलिस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. 

चित्रफितीतून जनजागृती
क्रेडिट व डेबिट कार्ड फसवणुकीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी चित्रफिती तयार केल्या असून लवकरच त्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत. 

गुन्ह्याची उकल करण्यासाठी प्रशिक्षण
दक्षिण, मध्य, पूर्व, पश्‍चिम व उत्तर या प्रादेशिक परिमंडळांमध्ये विशेष प्रशिक्षण कक्ष सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सायबर गुन्ह्यांची उकल करणे, दोष सिद्ध होण्याचे प्रमाण वाढवणे, गुन्ह्यांसंदर्भात संगणकीय ॲप्लिकेशनचे प्रशिक्षण, सायबर गुन्ह्यांसंदर्भात तपास मार्गदर्शिकेचा वापर करणे, गुन्ह्यांना प्रतिबंध करणे आदींचा समावेश आहे.

हे लक्षात ठेवा
 एटीएम सेंटरवर पिन क्रमांक टाईप करताना हाताने झाका
 एटीएम मशीनच्या स्किमरला शक्‍यतो लाईट नसते, त्यावरील लाईट बंद सुरू होत नसते
 पैसे काढल्यानंतर तत्काळ मोबाईलवरील संदेश पाहा
 एटीएम पिन क्रमांक कोणालाही सांगू नका
 बॅंक कुठल्याही परिस्थितीत पिन क्रमांक मागत नाही
 सायबर कॅफेतून ऑनलाईन खरेदी करू नका
 वेटर, दुकानदार यांना कार्डाचा पिन क्रमांक सांगू नका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com