पक्षांच्या झेंड्यांखाली दहीहंड्या

पक्षांच्या झेंड्यांखाली दहीहंड्या

भिवंडी - शहरात १५ ऑगस्ट आणि गोकुळ अष्टमीनिमित्त भाजप, शिवसेनेसह विविध राजकीय पक्ष आणि उत्सव मंडळांतर्फे ठिकठिकाणी उंचच्या उंच दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. त्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. यंदाही उत्सवास राजकीय झालर लागल्यामुळे रोख रक्कम आणि आकर्षक चषकाची बक्षिसे आहेत. त्यावर नाव कोरण्यासाठी पथकांचा जोमाने सराव सुरू आहे. ढोल-ताशा पथकेही सज्ज असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सिनेसृष्टीतील अभिनेते-अभिनेत्रींसह राजकीय नेतेही उपस्थित राहणार आहेत. शिवाजी चौक येथील मानाची हंडी म्हणून ओळखली जाणारी कपिल पाटील फाऊंडेशन, समन्वय प्रतिष्ठान आणि भाजप युवा मोर्चा मंडळाच्या दहीहंडीसाठी यंदा एक लाख ११ हजार आणि स्व. पुरुषोत्तम पाटील, किरण देशमुख चषक आहे; तर भंडारी कंपाऊंड येथील युवा शक्ती मंडळही एक लाख ११ हजार रुपयांची हंडी उभारणार आहे.

शहर परिसरात २८ ठिकाणी सार्वजनिक; तर २०० हून अधिक ठिकाणी खासगी दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. शिवाजी चौकात कपिल पाटील फाऊंडेशन व समन्वय प्रतिष्ठानतर्फे यंदा पोलिस आणि न्यायालयाच्या सूचनांचे पालन करून हंडी बांधण्यात येणार आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात येणार असून रुग्णवाहिका आणि डॉक्‍टरांचे पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाडा, वसई, भिवंडीतील ७० गोविंदा पथकांसह महिला पथकेही यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती ॲड. हर्षल पाटील यांनी दिली. शहरात सामाजिक सलोखा, वृक्षारोपण, ‘मुली वाचवा मुली जगवा’ आणि ‘शिक्षण’ या विषयांवर जनजागृती करणार असल्याची माहिती उत्सव मंडळाचे ॲड्‌. पाटील, नगरसेवक सुमित पाटील, वैभव भोईर यांनी दिली. सोहळ्यास सैराट फेम चित्रपट अभिनेत्री रिंकू राजगुरूसह अन्य तारे-तारका, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चौहान, खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजक सुमित पाटील, युवा अध्यक्ष वैभव भोईर यांनी दिली. कल्याण रोड टेमघर भादवड येथे शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे यांची आमदार चषक हंडी, अंजूर फाटा येथे मनसे राज मित्रमंडळाची राज चषक रोख रक्कम हंडी, मनसे विद्यार्थी सेना परिवर्तन फाऊंडेशनची शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तक दहीहंडी; तर भंडारी चौकात युवा शक्ती मंडळाची नगरसेवक यशवंत टावरे यांच्यातर्फे एक लाखाची दहीहंडी बांधण्यात येणार आहे.

उंचच उंच हंड्या
मानसरोवर, कल्याण रोड, कामतघर, धामणकर नाका, पद्मानगर, अशोक नगर, कोंबडपाडा, अजयनगर, पारनाका बाजारपेठ, दापोडा, पिंपळास, अनगाव, कोनगाव, शेलार, राहनाळ, सरवली, खारबाव अशा विविध ग्रामीण भागांतही राजकीय पक्ष आणि सार्वजनिक मंडळांतर्फे उंच उंच हंड्या उभारण्यात येणार आहेत. या वेळी सुरक्षिततेसाठी ठीकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली.

सूचना पाळा; अन्यथा कारवाई
स्वातंत्र्यदिन व दहीहंडी उत्सव एकत्र असल्यामुळे सर्वत्र विविध कार्यक्रम होणार आहेत. पोलिस यंत्रणा सतर्क असून न्यायालय आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा; अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा भिवंडीचे प्रभारी पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी शनिवारी (ता. १२) झालेल्या पोलिस शांतता समितीच्या बैठकीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com