"गोविंदा रे गोपाळाऽऽऽ' घातक प्लास्टिक टाळा... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

मुंबई -  "जय बजरंग बली की जय...' म्हणत मंगळवारी (ता. 15) दहीहंडी फोडण्यासाठी एकावर एक मानवी थर रचले जातील; पण यंदाचा उत्सव थोडा वेगळा असेल. प्रत्येक थराबरोबर निर्धार असेल तो "प्लास्टिकमुक्त मुंबई' करण्याचा. "सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने प्लास्टिकमुक्त मुंबईचा उपक्रम राबवला जात आहे. यंदा दहीहंडीच्या निमित्ताने मुंबई आणि परिसरातील शेकडो मंडळेही उपक्रमात सहभागी होणार आहेत. अवघ्या मुंबईत उद्या "गोविंदा रे गोपाळाऽऽऽ'बरोबरच "प्लास्टिक टाळा...'चा गजर घुमणार आहे. गिरगावपासून मागठाण्यापर्यंत आणि गिरणगावापासून भांडुपपर्यंत अनेक मंडळांनी "सकाळ'च्या मोहिमेचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.

मुंबई -  "जय बजरंग बली की जय...' म्हणत मंगळवारी (ता. 15) दहीहंडी फोडण्यासाठी एकावर एक मानवी थर रचले जातील; पण यंदाचा उत्सव थोडा वेगळा असेल. प्रत्येक थराबरोबर निर्धार असेल तो "प्लास्टिकमुक्त मुंबई' करण्याचा. "सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने प्लास्टिकमुक्त मुंबईचा उपक्रम राबवला जात आहे. यंदा दहीहंडीच्या निमित्ताने मुंबई आणि परिसरातील शेकडो मंडळेही उपक्रमात सहभागी होणार आहेत. अवघ्या मुंबईत उद्या "गोविंदा रे गोपाळाऽऽऽ'बरोबरच "प्लास्टिक टाळा...'चा गजर घुमणार आहे. गिरगावपासून मागठाण्यापर्यंत आणि गिरणगावापासून भांडुपपर्यंत अनेक मंडळांनी "सकाळ'च्या मोहिमेचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. दहीहंडी समन्वय समितीनेही मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. 

मागठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि गिरगावात शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांची दहीहंडी सर्वांचे आकर्षण असते. दोघांनीही "सकाळ'च्या मोहिमेला पाठिंबा दिला असून प्रत्यक्ष उत्सवादरम्यानही दिवसभर त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. दादर रेल्वेस्थानकाजवळ राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व "आयडियल'तर्फे होणाऱ्या दहीहंडी उत्सवात अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात. तिथेही "सकाळ'च्या मोहिमेचा आवाज घुमणार आहे. मुंबई प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस माधवीताई राणे यांच्यातर्फे गोरेगावात दहीहंडी होणार आहे. त्यांनीही प्लास्टिकविरोधी मोहीम अत्यावश्‍यक असल्याचे सांगितले. त्याखेरीज मध्य मुंबईत प्रभादेवी, काळाचौकी, गिरणगाव आदी अनेक ठिकाणीही दहीहंडी मंडळांबरोबरच घाटकोपरच्या तनिष्काही प्लास्टिकविरोधी जनजागृती करणार आहेत. 

प्रकाश सुर्वे यांचा मागठाण्यातील दहीहंडी महोत्सव 10 वर्षे आकर्षणाचे केंद्र बनला आहे. तिथे किमान पाचशे मंडळांसह 10 ते 15 हजार रसिक भेट देतात. दहीहंडीसाठी काही लाखांची बक्षिसे असतात. सुर्वे यांनी यंदा गुटखामुक्ती व प्लास्टिकमुक्ती अशा दोन संकल्पनांवर जनजागृती करण्याचे ठरविले आहे. दोन्ही धोकादायक वस्तूंपासून दूर राहण्याबाबत गोविंदांमध्ये जागृती केली जाणार आहे. गिरगावच्या उत्सवातही जनजागृतीसाठी दगडू सकपाळ पुढाकार घेणार आहेत. जनजागृतीबरोबरच प्लास्टिकला पर्याय असलेल्या वस्तू वापरल्या जाव्यात म्हणून पर्यावरणपूरक संदेश असलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे. 

"तनिष्का'ची वक्तृत्व स्पर्धा 
मुंबईतील दहीकाला मंडळे प्लास्टिकविरोधी संदेश समाजापर्यंत पोहोचवत असताना "सकाळ'चे महिलांसाठीचे व्यासपीठ असलेल्या "तनिष्का'च्या सदस्याही जनजागृती करणार आहेत. घाटकोपरमधील पद्मा मळवलकर यांचा तनिष्का गट कुर्ला कमानी परिसरातील काजूपाड्यात "प्लास्टिकमुक्त मुंबई' विषयावर महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेणार आहे. स्पर्धेदरम्यान प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे. समर्थ महिला मंडळ या उपक्रमाचे सहआयोजक आहेत. 

वडाळ्यातील मुलींचे पथकही सरसावले 
वडाळ्यातील श्री गणेश मुलींच्या गोविंदा पथकाने "सकाळ'च्या ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. मंगळवारी जिथे जिथे हे पथक जाईल तिथे सहभागी होणाऱ्या मंडळांना "प्लास्टिकचा वापर टाळा आणि पर्यावरणाचा समतोल राखा' असा संदेश ते देणार आहेत. हे पथक गेली 10 वर्षे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत दहीहंडी फोडण्यासाठी जाते. दरवर्षी समाजप्रबोधनाचे संदेश देण्याचे सामाजिक कार्य करण्याबाबत या पथकाची ख्याती आहे. 

वाढत चाललेल्या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. परिणामी नागरिकांना अनेक गंभीर आजारांचा सामनाही करावा लागत आहे. भविष्यात प्लास्टिकचे दुष्परिणाम वाढू नयेत म्हणून प्रत्येकाने दक्षता घेण्याची आज गरज आहे. समाजहिताच्या उद्देशाने "सकाळ'ने आजवर विविध उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे राबविले आहेत. "ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी' उपक्रमाला आमचा पाठिंबा आहे. दहीहंडी उत्सवात मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग असल्याने अशा वेळी समाजप्रबोधन करणे अतिशय उपयुक्त ठरते. आम्ही पाच थरांचा मनोरा रचून प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करणार आहोत, असे प्रशिक्षक मनोहर साळावकर यांनी सांगितले. 

दहीहंडी समन्वय समितीचाही  प्लास्टिकमुक्तीचा जागर 
"सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने राबवल्या जात असलेल्या प्लास्टिकमुक्त मुंबईच्या उपक्रमाला दहीहंडी समन्वय समितीनेही पाठिंबा दर्शवला आहे. मुंबई आणि शहरातून पथके वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी बाहेर पडतात. अशा वेळी पाणी पिण्यापासून खाण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यंदा प्लास्टिकचा कमीत कमी वापर करू, शक्‍य तिथे ते टाळण्याचा निर्धार दहीहंडी समन्वय समितीने केला आहे. हंडी फोडण्यासाठी ट्रकवरून फिरताना आणि आयोजनस्थळीही गोविंदा प्लास्टिकमुक्त मोहिमेच्या घोषणा देणार आहेत. 

"आयडियल'च्या सेलिब्रेटी दहीहंडीतही जनजागृती 
दादरमधील सुप्रसिद्ध "आयडियल'च्या दहीहंडीमध्ये यंदा "झी युवा'च्या "गर्ल्स हॉस्टेल' आणि "लव लग्न लोचा' मालिकांमधील सेलिब्रेटीज सहभागी होणार आहेत. "गर्ल्स हॉस्टेल'च्या तन्वी, सारा, वल्लरी, वनिता, मालती, नेहा आणि धनलक्ष्मी दादरमध्ये येणार आहेत. "लव्ह लग्न लोचा'मधील विवेक सांगळे, रुचिता जाधव, सक्षम कुलकर्णी, श्रीकर पित्रे, ओमकार आदी टीमही गोविंदा मंडळांचा उत्साह वाढवणार आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदूषण करू नका, असा प्रचार करणारी दहीहंडी अशी "आयडियल'ची ओळख आहे. "सकाळ'च्या प्लास्टिकमुक्त मोहिमेला मंडळाने पाठिंबा दिला आहे. दादरच्या मानाच्या दहीहंडीमध्ये प्लास्टिकमुक्त मुंबईचा नारा दिला जाणार आहे. 

Web Title: mumbai news dahihandi plastic