भ्रष्टाचारमुक्‍तीसाठी हवी रोज तासभर सूट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

राजपत्रित अधिकाऱ्यांचे 'पगारात भागवा' अभियान

राजपत्रित अधिकाऱ्यांचे 'पगारात भागवा' अभियान
मुंबई - राज्यात भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत असताना राजपत्रित अधिकाऱ्यांनी मात्र "पगारात भागवा' अभियान यशस्वी केले आहे. आता, हे अभियान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोचण्याचा संघटनेचा प्रयत्न असून, त्यासाठी एक ऑगस्टनंतर रोज बैठका आणि सभा घेण्याचे नियोजन आहे. या अभियानासाठी अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाजातून एक तासाची सूट मागितली आहे.

जिल्हा स्तरावरील बैठका आणि सभा घेण्यासाठी कामातून आपल्याला रोज एक तासाची सूट हवी आहे. त्यासंदर्भात सरकारने परिपत्रक काढावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने सामान्य प्रशासनाचे मुख्य सचिव (सेवा) मुकेश खुल्लर यांच्याकडे केली आहे. राज्यात फडणवीस सरकारकडून रोज पारदर्शक कारभाराचा गाजावाजा केला जात असताना त्याच पारदर्शक कारभाराचा भाग असलेल्या अधिकाऱ्यांनीही भ्रष्टाचारमुक्‍त सरकार-प्रशासनाचा नारा दिला आहे.

अधिकाऱ्यांकडून "पगारात भागवा' अभियान राबवले जात असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा महासंघाने केला आहे. राज्याच्या विकासासाठी व भ्रष्टाचारमुक्त सरकार-प्रशासन हे ब्रिदवाक्‍य घेऊन राज्यात एक ऑगस्टपासून जिल्हा बैठका आणि सभा घेण्यात येणार आहेत. या बैठकांसाठी राजपत्रित अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाजातून तासभर सूट हवी आहे. त्यासाठी एक ऑगस्टपूर्वी सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढावे, अशी विनंतीही महासंघाने केली आहे.

Web Title: mumbai news daily one hrs free for corruption free