मुंबईत दीड लाख झोपड्यांना धोका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

पावसाळा सुरू झाल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांच्या मनात भीतीने "घर' केले आहे. शेकडो वस्त्या, गावे आणि वाड्या दरडींच्या काळ्या छायेखाली आहेत. त्यांना सरकारी यंत्रणांनी यंदाही "नोटीस' नावाचा कागदाचा तुकडा दिला आहे. घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. अर्थात, ती रिकामी झालेली नाहीत. ठोस उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने एक उपचार उरकून टाकला आहे. रहिवाशी मात्र दरडींच्या दहशतीखालीच आहेत...

दहा हजार झोपड्या हलवा
मुंबई - शहर आणि उपनगरांत 329 ठिकाणच्या घरांना दरडींचा धोका आहे. सुमारे दीड लाख रहिवाशी दरडींच्या छायेखाली आहेत. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी बहुतेक मतदारसंघांमध्ये दरडीखाली वस्त्या आहेत. त्यात घाटकोपर, कुर्ला, विक्रोळी पार्कसाइट, साकीनाका, भांडुप, मुलुंड, असल्फा व्हिलेज, चांदिवली इत्यादी भागात मोठ्या प्रमाणावर दरडी आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दरडींलगतच्या झोपड्यांबाबत संबंधित प्राधिकरणांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर करण्याचे आदेशही नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले होते; मात्र महापालिका, म्हाडा, जिल्हाधिकारी यापैकी कोणीही दरडीलगतच्या रहिवाशांची दखल घेतलेली नाही. सध्या दहा हजार झोपड्यांना तातडीने हलवण्याची गरज आहे.

नेतीवलीचे माळीण होऊ नये!
कल्याणची नेतीवली टेकडी काही वर्षांपूर्वी हिरवीगार दिसत होती. आज तिच्या टोकापर्यंत झोपड्या आहेत. या टेकडीच्या दरडी तीनदा कोसळल्या. दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. झोपडपट्टीवासीयांचे इतर ठिकाणी पुनर्वसन न केल्यास नेतीवलीचे माळीण होण्याची भीती आहे. ही जागा वन विभाग आणि विमानतळ प्राधिकरण यांच्या मालकीची आहे. तेथे सुमारे पाच हजार झोपड्या आहेत. त्यालगतच्या कचोरे परिसरातही सुमारे 500 झोपड्या आहेत. त्यांनाही दरडींची भीती आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने या टेकडीजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला. त्यासाठी टेकडीचे लचके तोडले. त्यामुळे ती एका बाजूने कमकुवत झाली आहे. महापालिकेने संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव मंजूर केला; मात्र त्याचे काय झाले, याबद्दल कोणीही ब्र काढत नाही.

पाताळगंगा एमआयडीसीला धोका
रायगड - रसायनी येथील पाताळगंगा एमआयडीसीतील कारखाने आणि काही गावेही दरडींच्या दहशतीखाली आहेत. माणिकगडाच्या डोंगर रांगातील एका डोंगराच्या पाथ्याशी कैरे गाव आणि काही आदिवासी वाड्या आहेत. याच डोंगराच्या पाथ्याशी "एमआयडीसी'चे जलशुद्धीकरण केंद्र, बिग कोला कंपनी आणि इतर कारखाने आहेत. डोंगराच्या पश्‍चिमेला, पायथ्याशी कराडे बुद्रुक गाव आहे. त्यांनाही दरडींचा धोका आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात दोन-तीन ठिकाणच्या दरडी कोसळल्या. त्यात जीवितहानी झाली नाही, म्हणून प्रशासनाने गाफील राहू नये, असे येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून डोंगर उतारावर संरक्षक कठडे बांधण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी केली आहे. खोपोलीतही अनेक घरे दरडींखाली वसली आहेत.

सोलापुरात 100 घरांना धोका
सोलापूर - शहरात दरडसदृश भागांमध्ये अनेक घरे आहेत. येथील मुल्लाबाबा टेकडीवर शंभरहून अधिक घरे आहेत. त्यातील 400-500 रहिवाशांच्या जीवाला धोका आहे. हा परिसर टेकडीसदृश आहे; मात्र पूर्णपणे टेकडी नाही. तरीही पावसाळ्यात हा भाग धोकादायक होतो. त्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत धरून पावसाळा काढावा लागतो. काही वर्षांपूर्वी टेकडीवरील जीर्ण घर पडून टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या घरांचे नुकसान झाले होते. यंदाच्या पावसाळ्यातही अशा प्रकारचा धोका आहे. रहिवाशांना धोक्‍याची सूचना दिली आहे. याबाबत महापालिकेचे नगर अभियंता लक्ष्मण चलवादी म्हणाले, की पावसाळ्यात या परिसराला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे.

Web Title: mumbai news dangerous slum by hill