मानवनिर्मित महापुरात दोन मुलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

मुंबई - वांद्रे टर्मिनससमोरील 72 इंच व्यासाची तानसा जलवाहिनी शुक्रवारी (ता. 7) फुटल्याने पाण्याच्या लोंढ्यात दोन बालकांचा बुडून मृत्यू झाला. जलवाहिन्यांवरील अतिक्रमणांमुळे कोणकोणते धोके उद्‌भवू शकतात, हे "सकाळ'ने दोनच दिवसांपूर्वी विशेष सचित्र वार्तापत्राद्वारे निदर्शनास आणले होते.

मुंबई - वांद्रे टर्मिनससमोरील 72 इंच व्यासाची तानसा जलवाहिनी शुक्रवारी (ता. 7) फुटल्याने पाण्याच्या लोंढ्यात दोन बालकांचा बुडून मृत्यू झाला. जलवाहिन्यांवरील अतिक्रमणांमुळे कोणकोणते धोके उद्‌भवू शकतात, हे "सकाळ'ने दोनच दिवसांपूर्वी विशेष सचित्र वार्तापत्राद्वारे निदर्शनास आणले होते.

वांद्रे टर्मिनससमोरील इंदिरा नगर-बेहराम पाडा येथील मुख्य तानसा जलवाहिनी शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास फुटली. सुमारे 10 मीटर उंचीची कारंजी उडून पाणी प्रचंड वेगाने वाहू लागले. काही कळण्याआधीच तेथील झोपड्यांमध्ये पाणी शिरले आणि जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावत सुटले. काही काळ हाहाकार माजला. बघता बघता परिसर जलमय झाला. रस्त्याची नदी झाली. झोपड्यांतील सामानसुमान वाहून गेले. पाण्याच्या प्रवाहाने सुमारे 50 झोपड्यांची मोडतोड केली. कॉंक्रीटच्या भिंतीही कोसळल्या. रिक्षा आणि दुचाकीही बुडाल्या. पाण्याचा लोंढा येत असल्याचे दिसताच लोकांनी मुलांसह झोपडीबाहेर धाव घेतली. त्यामुळे अनेक जण बचावले. दोन भावंडांचा मात्र या मानवनिर्मित पुराने जीव घेतला.

एका झोपडीतील दोन लहान भावंडे झोपडीसह वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांची नावे संतोष (वय 8 महिने) व प्रियांका डोईफोडे अशी आहेत. संतोष व प्रियांका झोपडीत खेळत असताना या मानवनिर्मित महापुराने त्यांच्यावर घाला घातला. संतोषचा दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला; तर प्रियांकाला व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्‍टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शहरात सुरू होते. त्यामुळे पाण्याचा दाब निर्माण झाल्याने ती फुटल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली. या दुर्घटनेने जलवाहिन्यालगतच्या अतिक्रमणांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अतिक्रमणांच्या वाहिन्या
"अतिक्रमणांच्या वाहिन्या' या मथळ्याखाली "सकाळ'ने बुधवारी (ता. 5) मुंबईतील 400 किलोमीटरच्या जलवाहिन्यांवर अतिक्रमणे असल्याचे वास्तव उजेडात आणले होते. या अतिक्रमणांमुळे अनर्थ ओढवू शकतो. त्यामुळे जलवाहिन्या, मुंबईकर आणि तेथे राहणारे यांना धोका असल्याचे निदर्शनास आणले होते. उच्च न्यायालयाने जलवाहिन्यांवरील झोपड्या हटवण्याचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी पालिकेने केलेली नाही. ही अतिक्रमणे हटवणे हे पालिकेसाठी आव्हानात्मक आहे.

Web Title: mumbai news Death of two children in man-made flood