पुर्नविकास योजनेत डोंबिवली स्थानकाच्या समावेशाची मागणी

सुचिता करमरकर
बुधवार, 26 जुलै 2017

ली तीन वर्षे डोंबिवली स्थानक मध्य रेल्वेवरील सर्वात गर्दीच्या स्थानकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. दिवसाला तीन लाखांहून अधिक प्रवासी या स्थानकाचा वापर करत असून प्रति दिनी अडीच लाखांहून अधिक तिकिटे आणि पासेसची विक्री होते

कल्याण - सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीच्या माध्यमातून रेल्वेने सुरु केलेल्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेमध्ये मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली स्थानकाचा  समावेश करण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज (बुधवार) लोकसभेत केली. 

कल्याण स्थानकाचा पुनर्विकास पुढील टप्प्यात करण्याची ग्वाही देतानाच डोंबिवली स्थानकाचा समावेश या यादीत करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावर दिले. त्याचबरोबर ठाकुर्ली येथे ग्रीनफिल्ड टर्मिनसलाही मंजुरी देण्यात आली असून लवकरच त्याचेही काम सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाबाबत लोकसभेत बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पुरवणी प्रश्न विचारताना खा शिंदे यांनी कल्याण आणि डोंबिवली स्थानकांच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केला होता. भारतीय रेल्वेने देशभरातील ए1 आणि ए श्रेणीतील चारशे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना आखली आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात 23 स्थानकांच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुंबई उपनगरीय मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली या पाच स्थानकांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. कल्याणचा एकूण योजनेत समावेश असूनही पहिल्या टप्प्यात कल्याणची निवड करण्यात न आल्याबद्दल डॉ शिंदे यांनी आश्चर्य व्यक्त केले. गेली तीन वर्षे डोंबिवली स्थानक मध्य रेल्वेवरील सर्वात गर्दीच्या स्थानकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. दिवसाला तीन लाखांहून अधिक प्रवासी या स्थानकाचा वापर करत असून प्रति दिनी अडीच लाखांहून अधिक तिकिटे आणि पासेसची विक्री होते. त्यामुळे या स्थानकाच्याही पुनर्विकासाची गरज असून डोंबिवली स्थानकाचा समावेश पुनर्विकास योजनेत करणार का, असाही प्रश्न खा. डॉ. शिंदे यांनी विचारला. डोंबिवलीला या योजनेत समाविष्ट करुन घेण्याच्यादृष्टीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना रेल्वे मंत्री प्रभू यांनी यावेळी दिल्या. 

कल्याण आणि डोंबिवली ही मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीची स्थानके आहेत. तीन लाख प्रवासी प्रति दिवशी कल्याण स्थानकाचा वापर करतात. प्रति दिवशी दोन लाखांहून अधिक तिकिटे आणि पासेसची विक्री होते. लांब पल्ल्याच्या आणि उपनगरी मिळून पाचशेहून अधिक गाड्या कल्याण स्थानकात थांबतात. त्यामुळे कल्याण स्थानकाची निवड पहिल्या टप्प्यात होणे गरजेचे होते, असे मत व्यक्त केले.  कल्याण स्थानकाच्या पुनर्विकासाची प्रक्रिया कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला. 

त्यावर उत्तर देताना रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले की, पुनर्विकास करण्यात येणार असलेल्या चारशे स्थानकांच्या यादीत कल्याण स्थानकाचाही समावेश असून टप्प्याटप्प्याने या सर्व स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण स्थानकाचा पुनर्विकास पुढच्या टप्प्यात करण्यात येईल. त्याचप्रमाणे कल्याणजवळ ठाकुर्ली ग्रीनफील्ड टर्मिनसला मंजुरी देण्यात आली असून त्याच्याही कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

रेल्वे स्थानकाच्या भौगोलिक रचनेनुसार तसेच त्याच्या महत्वानुसार या योजनेंतर्गत पुर्नविकास केला जात आहे. गुजरात मधील गांधीनगर तसेच सुरत स्थानकांच्या विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे. गांधीनगर स्थानकाचा विकास पर्यटन स्थळांचा विचार करु होईल. सुरतमधे स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य सरकारी उपक्रमाच्या सहाय्याने ही योजना तयार करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news: demand for development of Dombivali Railway Station