वांद्रे, खारमध्ये डेंगी-हिवतापाची साथ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

खार रोड - बदलते हवामान आणि वेळीअवेळी येणाऱ्या पावसामुळे वांद्रे, खार आणि सांताक्रुझ परिसरात डेंगी आणि हिवतापाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. विभागातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 

खार रोड - बदलते हवामान आणि वेळीअवेळी येणाऱ्या पावसामुळे वांद्रे, खार आणि सांताक्रुझ परिसरात डेंगी आणि हिवतापाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. विभागातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 

वांद्रे, खार आणि सांताक्रुझ पूर्व परिसरात गोळीबार रोड, ज्ञानेश्‍वरनगर, महाराष्ट्रनगर, वाकोला, सुभाषनगर, भारतनगर, सरकारी वसाहत आदी परिसरात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. वांद्रे नागरी स्वास्थ्य केंद्रात चार डेंगी आणि दोन मलेरियाचे व हिवतापाचे रुग्ण उपचार घेत आहेत. वांद्रे नर्सिंग होममध्ये चार रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. शिवम नर्सिंग होममध्ये दोन डेंगीचे रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. पालिका व्ही. एन. देसाई रुग्णालयात डेंगीचे सात, मलेरिया सहा आणि हिवतापाचा एक रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसाला साथीच्या आजाराचे शंभरपेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी येत आहेत. रुग्णालयातील जागा अपुरी पडत असल्याने काही रुग्णांना उपचार करून घरी पाठवण्यात येत आहे, तर गंभीर रुग्णांना अन्य रुग्णालयात पाठवण्यात येत आहे, असे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. हरेश गोईमावला यांनी सांगितले. 

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन 
टाकाऊ वस्तू, साचलेले पाणी, शोभेच्या झाडांच्या कुंड्या, छतावरील प्लास्टिकमध्ये साचलेले पाणी, उघड्या पाण्याच्या टाक्‍या आदी ठिकाणी डासांची पैदास होत असते. नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. विभागात कीटकनाशक फवारणी करून घ्यावी. तापाची लक्षणे दिसताच पालिका आरोग्य केंद्रात जावे किंवा पालिका रुग्णालयात जावे. तसेच पालिका आरोग्यसेविका विभागात पाहणी करत असताना त्यांना तापाच्या रुग्णांची माहिती द्यावी, असे आवाहन माजी नगरसेवक अनिल त्रिंबककर यांनी नागरिकांना केले आहे.

Web Title: mumbai news dengue fever