उड्डाणपुलाखाली ढोल-ताशा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

तुर्भे - एकेकाळी पुण्यापुरत्या मर्यादित असलेल्या ढोल पथकांचा विस्तार आता नवी मुंबईत झपाट्याने होत आहे. ऐरोली, वाशी, नेरूळ, तुर्भे या प्रमुख उपनगरांत ढोल-ताशांचा नाद गुंजत आहे. अलीकडे त्याची क्रेझ वाढल्याने केवळ सणापुरता ढोल-ताशा मर्यादित राहिलेला नाही. त्यामुळे ही पथके नेहमीच त्याचा सराव करत आहेत. पावसामुळेही त्यांच्या सरावात खंड पडत नाही. ही पथके पावसाळ्यात चक्क उड्डणपुलांखाली त्यांचा सराव करत आहेत. त्यांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.

शहरातील ढोल-ताशा पथकांना जागेची अडचण भासते. शिवाय ते शनिवारी आणि रविवारी सराव करतात. त्यातच पाऊस सुरू झाल्याने त्यांनी आता नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर मार्गाशेजारी आणि उड्डाणपुलांखाली सराव सुरू केला आहे. बाप्पाच्या आगमनाला काही दिवस उरले आहेत. त्यामुळे ढोल-ताशा पथकांनी सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलांखालीही सराव सुरू केला आहे. नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील आणि उरण फाटा येथील उड्डाणपुलाखाली त्यांचा सराव सुरू आहे. या वेळी ध्वनिप्रदूषणाचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी पथकांकडून काळजी घेतली जाते. जिथे नागरी वस्ती आहे, तिथे ते सराव करत नाहीत. ऐरोलीतील नादगर्जा ढोल पथकाला तर गणेश आगमनापासून विसर्जनापर्यंत नवी मुंबई आणि मुंबईत मोठी मागणी असते. परंपरागत कलासंस्कृतीचा आविष्कार असलेल्या या पथकांना चांगले मानधनही मिळते. नवी मुंबईत आता अशी अनेक पथके तयार होत आहेत. तीन-चार महिने दर शनिवार व रविवारी सराव करणारी ही पथके आता गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. नादगर्जा पथकात गुरुवारी १४०  तरुण-तरुणी भाग घेणार आहेत. त्यात ४० ढोल, १२ ताशे, एक टोल बेल, सहा ध्वज, दोन शंख असतील.  

ध्वनिप्रदूषणाबाबत आम्ही खबरदारी घेतो. ठाणे-बेलापूर रस्त्याच्या बाजूला आम्ही सराव करतो. हा परिसर औद्योगिक वसाहतीचा असल्याने रविवारी बहुतेक कारखाने बंद असतात. त्यामुळे कोणालाही याचा त्रास होत नाही. 
- निखिल चौधरी, नादगर्जा ढोल पथक, ऐरोली

Web Title: mumbai news dhol tasha ganeshotsav