छोट्या जिवाची डायलिसिसपासून सुटका! 

हर्षदा परब
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

मुंबई - आता कधीच सुई लागणार नाही आणि डायलिसिसमुळे हातही दुखणार नाही, याचा अवघ्या 11 वर्षांच्या गुलसागरीन शेख हिला आनंद झाला आहे. तिच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात 1 ऑक्‍टोबरला शस्त्रक्रिया झाली. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षांनंतर रुग्णालयात लहान मुलीवर ही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे. 

मुंबई - आता कधीच सुई लागणार नाही आणि डायलिसिसमुळे हातही दुखणार नाही, याचा अवघ्या 11 वर्षांच्या गुलसागरीन शेख हिला आनंद झाला आहे. तिच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात 1 ऑक्‍टोबरला शस्त्रक्रिया झाली. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षांनंतर रुग्णालयात लहान मुलीवर ही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे. 

धारावीत राहणाऱ्या गुलसागरीन हिला दोनतीन वर्षांपासून त्रास होत होता. 2016 मध्ये तिची दोन्ही मूत्रपिंडे खराब झाल्याचे निदान झाले. आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावे लागत होते. त्यामुळे तिचा हातही खूप दुखत होता. खेळताही येत नव्हते. अभ्यास करण्यासाठी वर्गातल्या मैत्रिणींनी तिला मदत केली. 

अवयव प्रत्यारोपणासाठी दात्याच्या रक्ताशी, अवयवाशी अवयव स्वीकारणाऱ्याचा रक्तगट आणि इतर काही बाबी जुळणे आवश्‍यक असते. रक्तगट जुळत नसल्याने तिला सहा महिने वाट पाहावी लागली. काही जणांनी आजारी असल्यामुळे येण्यास नकार दिला. अखेर एका रुग्णाशी रक्तगट आणि अवयव जुळल्याने ही शस्त्रक्रिया करता आली, असे डॉ. अजित सावंत यांनी सांगितले. 

एका पहाटे 3 वाजता रुग्णालयातून फोन आला. झोपेतून उठवून आईने तिला रुग्णालयात आणले. डॉक्‍टरांनी हसत हसत आता डायलिसिस करावे लागणार नाही, असे सांगताच तिचा चेहरा उजळला. शस्त्रक्रियेनंतर आता लवकरच मी शाळेत जाऊ शकेन. एक महिना डॉक्‍टरांनी बाहेरचे काही खायचे नाही असे सांगितले आहे. त्यानंतर भरपूर खाणार, पण पहिल्यांदा मॅंगो ज्यूस पिणार, असे ती मोठ्या आनंदाने सांगते. 

प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्‍टरांच्या पथकाचे प्रमुख डॉ. अजित सावंत यांनी सांगितले, की गुलसागरीनच्या प्रकृतीत सुधारणा दिसते आहे. लोकमान्य टिळक रुग्णालयात दाता असलेल्या व्यक्तीवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतच असतात; मात्र गुलसागरीन ही मेंदू मृत व्यक्तीचे मूत्रपिंड मिळालेली आणि आमच्या रुग्णालयात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेली पहिली बालरुग्ण आहे, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली. 

या मुलीला नेहमी आकडी येत असे. डायलिसिस करून करून तिला जगवले. डॉक्‍टरांनीही खूप छान सांभाळले. आज तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून खूप आनंद झाला आहे, असे गुलसागरीनच्या आजी रहमत खातून यांनी सांगितले. 

गुलसागरीनबरोबर प्रतीक्षा यादीवर असलेल्या दुसऱ्या रुग्णाला बोलावले होते. त्याला हाडांचा संसर्ग असल्याने तो अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी अपात्र ठरला आणि गुलसागरीनला याचा लाभ झाला. तो रुग्ण लोकमान्य टिळक रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागाचा कर्मचारी असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

हिंदू-मुस्लिम नहीं जानते, वो ठीक होनी चाहिए... 
गुलसागरीनची रुग्णालयात काळजी घेणारा करण कुमार राम हा तिच्या गावातला मुलगा आहे. काही वर्षांपासून तो मुंबईत चहावाल्याच्या दुकानात काम करतो. गुलसागरीनला डायलिसिस करण्यासाठी, रुग्णालयात नेण्या-आणण्यासाठी तो मदत करत असे. "ती आमच्या गावची आहे. तिचा त्रास मला बघवत नव्हता. तिला रुग्णालयात उपचारांसाठी नेणे आई-वडिलांना शक्‍य होत नव्हते. म्हणून मी तिला मदत केली. हिंदू-मुस्लिम नहीं जानते, सिर्फ वो ठीक होनी चाहिए' असे करण कुमार राम म्हणाला. 

Web Title: mumbai news Dialysis