डायलिसीस सेंटरसाठी बाल विभाग बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

विक्रोळी - स्थापनेपासूनच वादग्रस्त असे बिरुद लागलेल्या कन्नमवार नगरमधील पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयाने बाल विभागाच्या स्थलांतराचा निर्णय घेऊन नवा वाद सुरू केला आहे. डायलिसीस सेंटरसाठी रुग्णालय प्रशासनाने बाल विभाग बंद करण्याचा घाट घातला आहे. हा विभाग बंद करून तो महिला विभागात स्थलांतरित केल्याने रुग्णांमध्ये असंतोष पसरला आहे. 

विक्रोळी - स्थापनेपासूनच वादग्रस्त असे बिरुद लागलेल्या कन्नमवार नगरमधील पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयाने बाल विभागाच्या स्थलांतराचा निर्णय घेऊन नवा वाद सुरू केला आहे. डायलिसीस सेंटरसाठी रुग्णालय प्रशासनाने बाल विभाग बंद करण्याचा घाट घातला आहे. हा विभाग बंद करून तो महिला विभागात स्थलांतरित केल्याने रुग्णांमध्ये असंतोष पसरला आहे. 

महात्मा फुले रुग्णालयात डायलिसीस सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी बाल विभाग महिला विभागात स्थलांतरित करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. हे स्थलांतरण करताना बाल विभागातील १० खाटा कमी करून फक्त पाच खाटाच ठेवल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे महिला विभागात असलेल्या ४० खाटांमध्ये या खाटा दाटीवाटीने बसवल्या आहेत. दोन खाटांमधील अंतरही कमी असल्याने रुग्णांना लावण्यात येणाऱ्या सलाईनचा स्टॅण्ड ठेवायलाही जागा नाही. अनेक वेळा महिला विभागात संसर्गजन्य रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे महिला रुग्णांमुळे लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. महिला संसर्गजन्य रुग्ण येण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उषा शर्मा यांनीही मान्य केले आहे. हे डायलिसीस सेंटर कधी सुरू होईल, हे रुग्णालय प्रशासनालाही माहिती नाही. 

महिनाभरापासून बालरोग तज्ज्ञ नाही
रुग्णालयात एक महिन्यापासून बालरोग तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे उपलब्ध डॉक्‍टरांकडून बालरुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. रुग्णालयात पालिकेचे कोणतेही डॉक्‍टर येण्यास तयार नाहीत.

दुसऱ्या मजल्यावर स्थलांतर?
रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर पडीक जागा आहे. डागडुजी करून ती बाल विभागासाठी वापरण्यात येऊ शकते. या जागेत बाल विभाग स्थलांतर करता येऊ शकला असता. 

रुग्णालयात अनेक सोई-सुविधांचा अभाव आहे. त्या पुरवण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करते. रुग्णालयात दिवसाला २५ ते ३० बालरुग्ण उपचारासाठी येत असतात. तरीही केवळ पाच बेड या विभागासाठी आहेत. असेही येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना नेहमीच शीव किंवा राजावाडीला पाठवण्यात येते. 
- ज्ञानदेव ससाणे, सामाजिक कार्यकर्ते 

वरिष्ठ स्तरावरून आदेश आल्याने बाल विभागाचे स्थलांतर करण्यात आले आहे. लवकरच डायलिसीस सेंटर सुरू होईल. बालरोग तज्ज्ञासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सप्टेंबरपर्यंत नवीन डॉक्‍टरची नियुक्ती होईल.
- डॉ. उषा शर्मा,  मुख्य वैद्यकीय अधिकारी

Web Title: mumbai news Dialysis Center