Mumbai News : आगरी कोळी वारकरी भवनावरून मनसे-शिंदे गटात मतभेद; टक्केवारीवरून जुगलबंदी | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

EKnath Shinde raju patil

Mumbai News : आगरी कोळी वारकरी भवनावरून मनसे-शिंदे गटात मतभेद; टक्केवारीवरून जुगलबंदी

डोंबिवली - दिव्यात आगरी कोळी वारकरी भवन उभे रहात आहे. बुधवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भवनचे भूमिपूजन होणार असून याच वारकरी भवनाच्या मुद्द्यावरून शिंदे गट व मनसेने एकमेकांना डिवचले. आगरी कोळी वारकरी भवन स्वखर्चातून बांधू असे बॅनर लावले. मात्र त्यांच्या खर्चाची काही तरतूद झालेली दिसत नाही असे म्हणत शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांना डिवचले.

म्हात्रे यांना उत्तर देताना पाटील यांनी टक्केवारी घेऊन पैसे कमविले नाही. स्वखर्चातून आमच्या वडिलांच्या नावे लवकरच वारकरी भवन उभारू असे म्हणत म्हात्रे यांना टक्केवारीवरून डिवचले आहे. हा वाद आता इथेच थांबतो की याला शिंदे गट पुन्हा उत्तर देतो हे पहावे लागेल.

दिव्यातील बेतवडे येथे आगरी कोळी भवन उभारण्यात येत असून बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे भूमिपूजन होत आहे. मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी खोणी तळोजा येथे 2020 साली वारकरी भवनचे भूमिपूजन केले होते. मात्र काही राजकीय हस्तक्षेपामुळे पुढे ते वारकरी भवन होऊ शकले नाही.

याच मुद्द्यावरून पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी आमदार पाटील यांना डिवचले. म्हात्रे म्हणाले, यांनी पाटील यांचे नाव न घेता काही लोकांनी स्वखर्चातून आगरी कोळी भवन बांधू अशी घोषणा केली होती. मात्र त्याचे कुठे काम सुरू असलेले दिसत नाही. खासदार शिंदे हवेत व ट्विटरवर आश्वासनं देत नाहीत. खासदार श्रीकांत शिंदे प्रत्यक्षात काम करणारे आहेत. काही लोकांनी

आगरी कोळी वारकरी भवन स्वखर्चातून बांधू अशा आशयाचे बॅनर रस्त्यावर लावले होते. त्यांच्या खर्चाची काही तरतूद झालेली दिसत नाही. असा टोला लगावला.

आगरी कोळी भवन या जिव्हाळ्याच्या विषयावर म्हात्रे यांचे डीवचने आमदार पाटील यांच्या जिव्हारी लागले आहे. मात्र त्यातही त्यांनी म्हात्रे याना सडेतोड उत्तर देत त्यांच्या खास शैलीत डिवचले आहे. आमदार पाटील म्हणाले, माझ्या बापदादांनी पाकिटमारी करुन किंवा कंत्राटदाराकडून पैसे घेऊन पैसे कमाविले नाही. आम्ही चार भाऊ आहोत. आमच्या वडिलांच्या नावाने वारकरी भवन लवकर उभे करु. ज्या वारकरी भवनासंदर्भात बोलले जात आहे. त्याच्यासाठी बिल्डरकडून बदली जागा घेतली होती. त्याच नीच राजकारण स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केले गेले. ज्या बिल्डरकडून बदली जागा घेणार होतो, त्या

बिल्डरला धमकाविले गेले. बिल्डरला सांगितले गेले की, तुझा 700 एकरचा प्लॅन पास होऊ देणार नाही. त्या बिल्डराने मला विनंती केली त्या जागेवर भवन उभारू नका. आता आम्ही दुसरी जागा शोधली आहे.

त्या जागेवर लवकरच स्वखर्चातून वडिलांच्या नावे वारकरी भवन उभारू असे सांगितले आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष ऍक्टिव्ह झाले असून मतदार संघातील विकास कामांचा आढावा घेण्यास पक्षातील वरिष्ठ पदादजीकाऱ्यांनी सुरवात केली आहे.

शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे हे सध्या ग्रामीण भागाचा दौरा करत कामांचा आढावा घेत आहेत. यावरून म्हात्रे ग्रामीण भागातून आमदारकीची जागा लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यातच ते मनसे आमदार पाटील यांच्यावर टीका करण्याची एक ही संधी सोडत नाहीत. पाटील यांचे आपल्या मतदार संघात वर्चस्व असून कितीही अडवणूक झाली तरी,

आम्ही आमच्या जोरावर काम करत आहोत हे दाखवत आहेत. टक्केवारीच्या राजकारणावरून पाटील यांनी म्हात्रे यांना आधी ही डिवचले होते. त्यात आता पुन्हा एकदा पाटील यांनी आपल्या भात्यातून बाण सोडला असून यावर आता म्हात्रे काय उत्तर देतात हे पहावे लागेल.