डोंबिवलीत पालिकेच्या स्मशानभूमीत वाहतोय 'मद्याचा महापूर'

मयुरी चव्हाण काकडे
सोमवार, 19 जून 2017

दोन महिन्यापूर्वी मैत्रिणीच्या पतीचे निधन झाले होते. त्यावेळी लाकडे उपलब्ध नाही असे सांगून या ठिकाणी अंत्यविधी करण्यास नकार दिल्यामुळे डोंबिवलीत अन्य ठिकाणी अंत्यविधी करावा लागला.
- कल्याणी वर्तक, नागरिक

डोंबिवली - एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका भविष्यातील स्मार्ट सिटीचे स्वप्न रंगवत आहे. तर, दुसरीकडे ठाकुर्ली, चोळेगाव येथील पालिकेची प्रशस्त स्मशानभूमीत दिवसाढवळ्या दारू पार्ट्या आणि जुगार खेळला जात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

स्मशानात  दारूच्या बाटल्यांचा खच, पत्ते, मृत प्राणी, दारुडे आणि चरशी लोकांचा वावर पाहून मृत्यूनंतरही मृताच्या आत्म्यास  लाज वाटेल असे अंगावर काटा आणणारे हे भयानक चित्र येथे दिसून येते. इतकेच नाही तर येथील परिसरात गावठी दारू मोठ्या प्रमाणात विकली जात असल्यामुळे ग्राहक या स्मशानभूमीतच बिनधास्त दारू पार्ट्या करतात. धक्कादायक बाब म्हणजे पालिकेचा सुरक्षारक्षकच या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे गावठी दारूच्या व्यावसायिकांचे कोणाशी हितसंबंध तर नाही ना असे एक ना अनेक सवाल निर्माण झाले आहे.

खंबाळपाडा येथील भर रस्त्यावर असणाऱ्या स्मशानभूमीचे  भीषण वास्तव  सकाळ ने काही दिवसांपूर्वी सकाळने समोर; आणले  होते. आता  चोळेगाव येथील स्मशानभूमीही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. लाखो रुपये खर्च करून चोळेगाव येथील प्रशस्त स्मशानभूमी बांधण्यात आली. मात्र, या ठिकाणी चालणारे अवैधधंदे उघडे पडू नये म्हणून अनेकवेळेला अंत्यविधी करण्यासाठी काही स्थानिक नागरिकांकडून विरोध केला जातो, असा आरोप काही नागरिकांनी केला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या दहशतीमुळे  नागरिक यावर भाष्य करणे  टाळतात. या ठिकाणी पालिकेचा सुरक्षारक्षक नसल्याने याठिकाणी प्रेतावर अंत्यविधी होताना डेथ सर्टीफिकट व इतर गोष्टींची तपासणीच होत नसल्याने या ठिकाणी अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्मशान हे मुक्ती मिळण्याचे ठिकाण मात्र चोळेगावातील स्मशानभूमीत प्रेत ठेवण्यात येते त्या सरण खांबासकट सर्वत्र असलेल्या दारूच्या बाटल्या, पेले, पत्ते सिगारेटची पाकीटं, मृत प्राणी आणि सभोवताली असलेले घाणीचे साम्राज्य पाहून स्मार्ट सिटीचे ढोल वाजवणाऱ्या सांस्कृतिक  नगरीत मृत्यूनंतरही नागरिकांचा जीव गुदमरत आहे. या ठिकाणी पालिकेचा सुरक्षारक्षक नसल्याची बाब पालिका अधिका-यांच्या वारंवार निदर्शनास आणून दिली. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले असे स्पष्टीकरण येथील भाजपाच्या स्थानिक नगरसेविकेचे पती तथा माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी दिले. मात्र, या ठिकाणी सद्यस्थितीत प्रेतावर अंत्यविधी करताना कोणतीही नियम पाळले जात नसल्याचे चौधरी यांनी सकाळशी बोलताना मान्य केले.

दोन महिन्यापूर्वी मैत्रिणीच्या पतीचे निधन झाले होते. त्यावेळी लाकडे उपलब्ध नाही असे सांगून या ठिकाणी अंत्यविधी करण्यास नकार दिल्यामुळे डोंबिवलीत अन्य ठिकाणी अंत्यविधी करावा लागला.
- कल्याणी वर्तक, नागरिक

Web Title: Mumbai news Dombivali Graveyard situation