डोंबिवली : दिव्यात नालेसफाई पेटली ! 

मयुरी चव्हाण काकडे
बुधवार, 14 जून 2017

शिवसेनेचे दिव्यात एकूण 8 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, भोईर यांच्या पाहणी दौऱ्यावेळी केवळ एकच नगरसेवक उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सेनेच्या या अंतर्गत गटबाजीमुळे भाजपाच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटल्या  असून  सेनेतील अंतर्गत गटबाजी  चव्हाट्यावर आली आहे. 

डोंबिवली : एकीकडे कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा विभागातील बुधवारी नाल्यांची पाहणी केली तर दुसरीकडे दिव्यातील नालेसफाईत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत बुधवारी  भाजपने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. त्यामुळे दिव्यातील नालेसफाईचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. विशेष म्हणजे, आमदारांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शिवसेनेचा एक नगरसेवक वगळता अन्य नगरसेवकांनी पाठ दाखविल्याने पक्षातील अंतर्गत  राजकीय मतभेत चव्हाट्यावर आले आहेत. 

सुभाष भोईर यांची नालेसफाईची पाहणी आणि नालेसफाईच्या मुद्द्यावरून भाजपाने केलेले एकदिवसीय लाक्षणिक उपोषण यावरून बुधवारी दिव्यात नालेसफाईचा विषय चांगलाच गाजला. कंत्राटदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे संगनमताने कामे न करताच नालेसफाईचा निधी लाटण्याच्या तयारीत असल्याचा सनसनाटी आरोपही भारतीय जनता पार्टी दिवा शीळ मंडळाने केला. दिव्यातील नालेसफाईत कंत्राटदार, स्थानिक नगरसेवक आणि अधिकारी यांचा हातसफाईचा प्रयत्न होत आहे. सर्व सामान्य दिवेकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. यात गैरव्यवहार करणारे अधिकारी आणि ठेकेदारांवर फौजदारी केस करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे कल्याण-डोंबिवली जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी सांगितले.  त्यामुळे  सेना आणि भाजपमध्ये  नालेसफाईवरून येणाऱ्या  काळात जोरदार  वाद पेटण्याची चिन्ह  निर्माण झाली आहेत. 

शिवसेनेचे  दिव्यात  एकूण 8 नगरसेवक   निवडून आले आहेत. मात्र,  भोईर यांच्या पाहणी दौऱ्यावेळी  केवळ एकच नगरसेवक उपस्थित असल्याने   आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सेनेच्या या  अंतर्गत गटबाजीमुळे  भाजपाच्या गोटात  आनंदाच्या उकळ्या फुटल्या  असून  सेनेतील अंतर्गत गटबाजी  चव्हाट्यावर आली आहे. 

इंजिन थंडावले 
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या  काळात  मनसेचे  जोरदार प्रचार  करत वातावरणनिर्मिती  केली  होती. विविध राजकीय  स्टंट  करत  मनसेच्या इंजिनाने प्रचारात जोरदार मुसंडी मारली  होती. मात्र,  निवडणुकीनंतर  मनसे  पुन्हा अदृश्य  झाली  असून   नालेसफाईच्या मुद्द्यवरूनही  इंजिन  थंडच  असल्याचे दिसून येते. 

Web Title: mumbai news dombivali nala safai drainage cleaning