'डोंबिवली रासरंग' मध्ये आदित्य ठाकरेंनीही धरला ठेका

मयुरी काकडे-चव्हाण
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

डोंबिवली: डोंबिवलीत डीएनसी शाळेच्या मैदानावर शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'रासरंग ' या कार्यक्रमाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी (ता. 25) भेट दिली. यावेळी दांडियाच्या तालावर बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाईसोबत आदित्य ठाकरे यांनी देखील ठेका धरल्याने उपस्थित तरुणाईने एकच जल्लोष केला.

प्रत्येक दसरा मेळावा हा दिशा देणारा असतो. या दसरा मेळाव्यालाही शिवसेना पक्षप्रमुख एक नवीन दिशा देतील. त्यासाठी येणा-या दसरा मेळाव्यापर्यंत काही दिवस वाट पाहावी लागेल, असे सूचक वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. त्यामुळे येत्या मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तरुणाईचा जल्लोष पाहून आदित्य ठाकरे हे व्यासपीठावरून खाली उतरत त्यांच्यामध्ये सहभागी झाले. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत नृत्याचा आनंद लुटत फोटोसेशनही केले.

नेते झाले वादक
तरुणाईचा सळसळता उत्साह, धमाकेदार गाण्यांची बरसात अन बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई पाहून नेते मंडळींनाही उत्साहाचे भरते आले अन साक्षात व्यावसायिक वाजंत्रीच्या जागा सेनेच्या पदाधिका-यांनी घेतल्या. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते राजेश मोरे यांनी विविध वाद्ये वाजवायला सुरवात केली. व्यासपीठावरील हे दृश्य पाहून उपस्थित प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला अन् राजकीय मंडळींमधील दडलेला कलाकार पाहून नागरिकही सुखावले. व्यावसायिक वादकांच्या तोडीस तोड राजकीय पदाधिका-यांनी वाद्ये वाजविल्याने दांडियाप्रेमींचा उत्साहही शिगेला पोहचला होता.

Web Title: mumbai news dombivli rasrang and aditya thackeray dandiya