शेव-चिवडा खाल्ला; मात्र भेटीला मुकलो...

शेव-चिवडा खाल्ला; मात्र भेटीला मुकलो...

वसई - नालासोपारा येथील बौद्ध स्तुपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धजयंतीनिमित्त ९ मे १९५५ रोजी भेट दिली होती. त्यांना पाहण्याची, भेटण्याची इच्छा असल्यामुळे मी वसईतून नालासोपाऱ्याला आलो; मात्र ते तासभर आधीच निघाले होते... त्यांनी सर्वांसाठी आणलेला शेव-चिवडा मी खाल्ला; मात्र त्यांची भेट न झाल्याची खंत आजही आहे, अशी आठवण वसईतील ८२ वर्षांचे हरिभाऊ भोईर यांनी सांगितली. 

हरिभाऊ भोईर सातिवली येथे राहतात. वसईतील एका खून प्रकरणात चार जणांना फाशीची शिक्षा झाली होती. त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबडेकर काही कागदपत्रांसाठी टांग्यातून वसईच्या न्यायालयात आले होते. त्यांना पाहण्यासाठी नागरिक आणि वकिलांनीही गर्दी केली होती, अशी आठवण भोईर यांनी सांगितली. ते पुढे म्हणाले, महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहात माझे काका सहभागी झाले होते. त्या वेळी झालेल्या हल्ल्यात त्यांचे डोकेही फुटले होते. वसईतच पाचवी धम्मदीक्षा झाली. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम झाले. कामणचे हरिश्‍चंद्र मोरे, तुळिंजचे रामचंद्र तांबे, नालासोपाऱ्यातील महात्मा फुलेनगरमधील गोविंद वाळिंजकर, राघोबा जाधव यांच्यासह अनेक जण बाबासाहेबांच्या चळवळीत होते.

डॉ. आंबेडकर यांनी समाजाला ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, असा संदेश दिला; परंतु आजचे पुढारी त्याकडे दुर्लक्ष करून समाजहिताला दुय्यम स्थान देत आहेत. बाबासाहेबांचे नाव वापरून पोट भरत आहेत. त्यांनी दुकानेच थाटल्यामुळे समाजाचे नुकसान होत आहे, अशी खंत भोईर यांनी व्यक्त केली. बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले. समाजातील अनेक जण उच्चशिक्षित आहेत, चांगल्या पदांवर आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

पालकांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळे अनेकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाला प्रगतिपथावर नेले. त्यांनी रचलेला शिक्षणाचा पाया बळकट केला पाहिजे.
- प्रज्ञा भोईर  (हरिभाऊ भोईर यांची नात)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com