आंबेडकरी अनुयायांना मुंबईकरांची मदत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी परिसरात देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांची पावसामुळे मोठी गैरसोय झाली. त्यांच्या मदतीसाठी आंबेडकरी चळवळीतील विविध पक्षांचे कार्यकर्ते पक्षभेद विसरून एकवटले. कार्यकर्त्यांनी मंगळवारी पहाटेपर्यंत चैत्यभूमीवरील अनुयायांची शहर आणि उपनगरांतील समाज मंदिरे आणि महापालिकेच्या शाळांत राहण्याची व्यवस्था केली. 

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी परिसरात देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांची पावसामुळे मोठी गैरसोय झाली. त्यांच्या मदतीसाठी आंबेडकरी चळवळीतील विविध पक्षांचे कार्यकर्ते पक्षभेद विसरून एकवटले. कार्यकर्त्यांनी मंगळवारी पहाटेपर्यंत चैत्यभूमीवरील अनुयायांची शहर आणि उपनगरांतील समाज मंदिरे आणि महापालिकेच्या शाळांत राहण्याची व्यवस्था केली. 

ओखी वादळामुळे सोमवारी सायंकाळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शिवाजी पार्कवर दाखल झालेल्या आंबेडकरी अनुयायांचे प्रचंड हाल झाले. महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरल्याने अखेर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी चैत्यभूमीवरील अनुयायांच्या मदतीसाठी दाखल होण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले. याला प्रतिसाद देत वरळी, वडाळा, माटुंगा, धारावी, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, अंधेरी, कांदिवली, गोरेगाव आदी परिसरातील विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्ते तातडीने चैत्यभूमीवर आले. या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कमध्ये पावसात भिजत असलेल्या अनुयायांना गाड्यांची व्यवस्था करून आपापल्या विभागातील समाज मंदिरे आणि महापालिकेच्या शाळांत नेऊन तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण सुकाणू समिती, भीम आर्मी, बहुजन समाज पार्टी, कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था, रिपब्लिकन पक्षांचे गट, हिंदुस्थान पेट्रोलियम कर्मचारी संघटना, मी बुद्धिस्ट फाऊंडेशन आदी अनेक संघटनांनी बेस्ट आणि महापालिकेशी संपर्क साधून अनुयायांची जेवण, निवारा आणि आरोग्य तपासणीची व्यवस्था केली. माटुंगा लेबर कॅम्पमधील भीम आर्मीचे संजय भालेराव, बहुजन समाज पार्टीचे अनिल भंडारे, विशाल निरभवने, अतुल बागुल आदी कार्यकर्त्यांनी बेस्ट बसच्या मदतीने आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशमधून आलेल्या आंबेडकरी अनुयायांची राहण्याची व्यवस्था डॉ. आंबेडकर हॉलमध्ये केली आहे. 

शौचालयाच्या वापरासाठी अनुयायांची लूट 
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो जनसमुदाय दादरमध्ये दर वर्षी येतो. या पार्श्‍वभूमीवर दादर परिसरातील सुलभ शौचालये विनामूल्य देण्याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात येतात; मात्र पावसामुळे गैरसोय झालेल्या अनुयायांची दादरमधील शौचालयचालकांकडून लूट सुरू होती. आंघोळीसाठी 15 रुपये आणि शौचासाठी 5 रुपये घेण्यात आले. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी शौचालयचालकांची भेट घेऊन पालिकेच्या निर्णयाची माहिती दिली. त्यामुळे ही वसुली थांबली. 

छबिलदास मराठी शाळेत गैरसोय 
दादर पश्‍चिमेकडील छबिलदास मराठी शाळेत सुमारे एक हजार अनुयायी थांबले आहेत; मात्र सोमवारी रात्रीपासून त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने आजूबाजूच्या हॉटेलांतून त्यांना ते घ्यावे लागत आहे.

Web Title: mumbai news Dr. babasaheb ambedkar Mahaparinirvan Din Chaitya bhoomi Dadar