बेपत्ता डॉ. अमरापूरकरांचा मृतदेह समुद्रात सापडला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

मुंबई - मुंबईत मंगळवारी (ता. 29) झालेल्या मुसळधार पावसात बेपत्ता झालेले बॉम्बे रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्‍टर दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी कोळीवाडा समुद्रात सापडला.

मुंबई - मुंबईत मंगळवारी (ता. 29) झालेल्या मुसळधार पावसात बेपत्ता झालेले बॉम्बे रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्‍टर दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी कोळीवाडा समुद्रात सापडला.

डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातील नामांकित पोटविकारतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. मंगळवारपासून डॉ. अमरापूरकर बेपत्ता होते. पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अनेक लोक वाहने रस्त्यावर सोडून चालत घरी निघाले होते. अमरापूरकरही सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रभादेवीला घराच्या दिशेने निघाले होते. लोअर परेलपासून प्रभादेवीपर्यंत चालत जाऊन घर गाठण्याचा अमरापूरकर यांचा विचार होता. एल्फिन्स्टन पश्‍चिम भागात गाडी सोडून गुडघाभर पाण्यातून वाट काढत अमरापूरकर चालत गेले, पण ते घरी पोचलेच नव्हते.

पाण्याचा निचरा व्हावा म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांनी एल्फिन्स्टनमधील मॅनहोलचे झाकण काढले होते. लोकांच्या माहितीसाठी त्यात बांबू लावला होता. पण अंदाज न आल्याने डॉ. अमरापूरकर त्यात कोसळले. तेव्हापासून त्यांचा शोध घेण्यात येत होता. अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.

डॉ. अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. हरिभाई देवकरण शाळेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले वैद्यकीय शिक्षणही त्यांनी सोलापुरातूनच पूर्ण केले होते. मुंबई विद्यापीठातील पोटविकारशास्त्र (गॅस्ट्रोअँड्रॉलॉजी) शाखेतले ते पहिले तज्ज्ञ ठरले. बॉम्बे रुग्णालयाच्या गॅस्ट्रोअँड्रॉलॉजी विभागाचे ते प्रमुख होते. त्यांची पत्नी डॉ. अंजली या नायर रुग्णालयात कार्यरत आहेत. दोन्ही मुले उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आहेत.
Web Title: mumbai news dr. deepak amrapurkar death body receive