अमली पदार्थाचे रॅकेट उघडकीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

दिल्ली पोलिसांची कारवाई; मुंबईसह परदेशात नेटवर्क

दिल्ली पोलिसांची कारवाई; मुंबईसह परदेशात नेटवर्क
मुंबई - दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश केला. मुंबईतून अमली पदार्थाचे नेटवर्क चालवणाऱ्या अबू असलम कासीम आझमी उर्फ असलम याला पोलिसांनी मंगळवारी (ता. 6) सांताक्रूझमधील हॉटेलमधून अटक केली. 40 कोटींचे पाच किलो पार्टी ड्रग्ज (एमडीएम) जप्त केले. अबू हा एका राजकीय नेत्याचा नातेवाईक आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमित अग्रवाल, अवधेश कुमार, चंदन रायला यांनाही अटक केली.

रविवारी (ता. 4) मुंबईहून एक पार्सल येईल, त्यात पार्टी ड्रग्ज असून ते अमेरिका आणि इंग्लडला पाठवले जाणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. वरिष्ठ अधिकारी अखिलेश्‍वर स्वरूप यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.

सायंकाळी दिल्ली-जयपूर महामार्गावर पोलिसांनी सापळा लावून अवधेशला ताब्यात घेतले. तो दिल्लीतील एका लॉजिस्टिकमध्ये काम करायचा. त्याच्याकडून पाच किलो अमली पदार्थ जप्त केले. त्याच्या चौकशीत अमित आणि चंदनचे नाव पुढे आले. 2015 मध्ये चंदनने दिल्लीत एक कंपनी सुरू केली. दिल्लीतून अमली पदार्थ दुबईत पाठवले जात होते. प्रत्येक किलोमागे चंदनला एक लाख रुपये मिळायचे. अमित आणि चंदनच्या चौकशीत असलमचे नाव उघड झाले.

Web Title: mumbai news drugs racket