दत्तगुरूचा पुनर्विकास रखडला

दत्तगुरूचा पुनर्विकास रखडला

बेलापूर - नेरूळ सेक्‍टर ६ मधील दत्तगुरू सोसायटीतील सिडकोने बांधलेल्या इमारती अतिधोकादायक बनल्या आहेत. त्यांच्या पुनर्बांधणीसाठी सोसायटीचा भूखंड कमी पडत असल्याने सोसायटीने सिडको आणि पालिकेच्या सहमतीने सुमारे १२ लाखांना शेजारचा भूखंड खरेदी केला आहे; परंतु हा भूखंड खुल्या जागेसाठी राखीव असल्याने महापालिका बांधकामासाठी परवानगी देत नाही. त्यामुळे सोसायटीचा पुनर्विकास रखडला असल्याने येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतीत राहावे लागत आहे.

सिडकोने १९९६ मध्ये नेरूळ सेक्‍टर सहामध्ये बांधलेल्या दत्तगुरू सोसायटीमधील घरांचा ताबा नागरिकांना दिला. ‘ए’ टाईपच्या या दोन इमारतींमध्ये १३६ सदनिका आहेत. निकृष्ट बांधकामामुळे काही वर्षांतच या सोसायटीतील इमारती धोकादायक बनल्या. इमारतीच्या कॉलमला तडे गेले आहेत. प्लास्टर पडले आहे. स्लॅबचे प्लास्टर कोसळून अनेक रहिवासी जखमी झाले. जिना कोसळला आहे. त्यामुळे येथील इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेकडे धाव घेतली होती. सोसायटीचे एकूण क्षेत्रफळ एक हजार ९६६ चौरस मीटर आहे. पुनर्बांधणीच्या नियमानुसार या सोसायटीला दोन हजार ३६० चौरस मीटरची गरज होती. ३९४ चौरस मीटर जागा कमी पडत असल्याने सिडकोकडून शेजारील भूखंड घेण्याचा सल्ला पालिकेने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर सोसायटीने हा भूखंड घेऊन सिडकोकडून ऑगस्ट २०१६ रोजी ११ लाख ८७ हजार ७०० रुपये खर्च करून जागा खरेदी केली. पालिकेने त्यानंतर प्लान आणि पुनर्बांधणी नकाशे सोसायटीकडून मागविले. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ते दिले. त्यानंतर काही दिवसांनी सिडकोकडून सोसायटीने घेतलेला भूखंड हा ओपन स्पेस म्हणून आरक्षित असल्याने त्यावर बांधकाम करू शकत नाही, असे सांगून त्यांना बांधकाम परवानगी नाकारली. पालिकेचीही बांधकाम परवानगी नसल्याने या सोसायटीमधील इमारतींच्या पुनर्बांधणीचे काम रखडले आहे. २००७ पासून पालिकेने येथील इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. तीन वर्षांपासून ही सोसायटी राहण्यास आयोग्य ठरवत अतिधोकादायक म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे या रहिवाशांना जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतीत राहावे लागत आहे.

सोसायटीला सिडकोने जागा द्यावी हा विषय पालिकेचा नव्हता; परंतु या नागरिकांचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पुढाकार घेऊन सोसायटीच्या शेजारची ओपन स्पेसमधील जागा देण्यासाठी सिडकोला पत्र दिले होते. सिडकोने दत्तगुरू सोसायटीला दिलेली जागा ओपन स्पेससाठी आरक्षित आहे. त्यामुळे तेथे बांधकाम करता येणार नाही. 
- ओवैस मोमीन, सहायक संचालक, पालिका नगररचना

सेक्‍टर सहामधील सिडकोच्या धोकादायक इमारतींमध्ये गरीब नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. दत्तगुरू सोसायटीला बांधकाम परवानगी द्यायची नव्हती तर ओपन स्पेसमधील भूखंड का घ्यायला लावला. पालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींचा प्रश्‍न गांभीर्याने घेऊन लवकर सोडवावा. येथील रहिवाशांची राहण्याची सोय करावी.
- सूरज पाटील, नगरसेवक

सोसायटीमधील इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी आम्ही धावपळ केली. पुनर्बांधणीसाठी कमी पडत असलेली जागाही सिडकोकडून खरेदी केली आहे; पण आता पालिका बांधकामाला परवानगी देत नाही. इमारतींची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्या कधी कोसळतील याची शाश्‍वती नाही. पालिकेने आमचा प्रश्‍न मार्गी लावावा.
- राजेंद्र बागल, अध्यक्ष, दत्तगुरू सोसायटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com