आर्थिक गुन्हे शाखेचा लवकरच "रिफंड सेल'

अनिश पाटील
सोमवार, 29 मे 2017

मुंबई पोलिसांचा उपक्रम; तक्ररदारांना 3500 कोटी वितरणाचे उद्दिष्ट

मुंबई पोलिसांचा उपक्रम; तक्ररदारांना 3500 कोटी वितरणाचे उद्दिष्ट
मुंबई - आर्थिक गुन्ह्यांतील तक्रारदार गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम सहज मिळावी, यासाठी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा लवकरच "रिफंड सेल'ची स्थापना करणार आहे. त्याअंतर्गत विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या तीन हजार 500 कोटींचे संबंधितांना वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या वृत्ताला आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख सहपोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दुजोरा दिला आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आर्थिक गुन्ह्यांतही प्रचंड वाढ होत आहे. काही वर्षांत मुंबईत घडलेल्या आर्थिक गुन्ह्यांमध्ये गुंतवणूकदारांची हजारो कोटींची फसवणूक झाली आहे. त्यात 5600 कोटींचा एनएसईएल गैरव्यवहार, चार हजार कोटींचे साईप्रसाद गैरव्यवहार प्रकरण आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. अशा गुन्ह्यांतील आरोपींना अटक झाल्यानंतर आरोपींनी गुन्ह्यांतून मिळवलेल्या मालमत्तेवर न्यायालयाच्या आदेशानुसार टाच आणली जाते. त्यानंतर त्या मालमत्तेचा लिलाव करून त्यातील रक्कम संबंधित तक्रारदारांना देण्यात येते. मात्र, या प्रक्रियेत खूप कालावधी जातो. त्या दरम्यान काही तक्रारदारांचे पत्ते, संपर्क क्रमांक बदलतात, अनेकजण रक्कम परत मिळण्याची आशाच सोडतात. त्यामुळे अशा गुंतवणूकदारांशी संपर्क साधून एकाच ठिकाणी त्यांची ओळख पटवणे, त्या संदर्भात पुरावे स्वीकारणे, बॅंक खात्यांची पडताळणी करणे आदी कामांसह तक्रारदारांना रक्कम सहज मिळावी, यासाठी हा "रिफंड सेल' सुरू केला जाणार आहे.
गेल्या काही वर्षांत लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या सर्वांना एकाचवेळी रक्कम वितरण करण्यास जागा अपुरी पडेल, त्यामुळे सुरवातीला दोन- दोन गुन्ह्यांतील गुंतवणूकदारांना बोलावून त्यांची रक्कम दिली जाईल. त्यासाठी विशेष वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

"रिफंड सेल'ची स्थापना हे सामान्य गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.
- आशुतोष डुंबरे, सहपोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख

शहरातील आर्थिक गुन्हे
वर्ष - गुन्हे - रक्कम (कोटीत)

2017 (एप्रिलपर्यंत) - 49 - 982
2016 - 119 - 4273
2015 - 105 - 5560
2014 - 105 - 2144

Web Title: mumbai news the economic offenses wing of the refund cell