पॉवर एक्‍स्चेंजमधील वीजही कडाडली 

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई - देशातील कोळसाटंचाईच्या संकटामुळे आता पॉवर एक्‍स्चेंजमधील वीजही कडाडली आहे. एक्‍स्चेंजमधील विजेचा दर युनिटमागे सरासरी 8 रुपये आहे. तो काही दिवसांपूर्वी दीड ते दोन रुपयांनी घसरला होता. 

एक्‍स्चेंजची वीज घेण्यासाठीही वितरण कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. भारनियमनाची परिस्थिती पाहता पॉवर एक्‍स्चेंजमधून अधिक दराने वीज खरेदी करण्याची तयारी महावितरणने सुरू केली आहे. तशी परवानगी मागणारे पत्र महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला महावितरणने सोमवारी (ता.18) पाठवले. या वीज खरेदीला लवकरच परवानगी मिळेल. 

आयोगाच्या नव्या नियामक धोरणानुसार कमाल 4 रुपये प्रतियुनिटने वीज खरेदी करण्यासाठी आयोगाने महावितरणला मंजुरी दिली आहे; पण पॉवर एक्‍स्चेंजमधील विजेचे दर चढे आहेत. आयोगाच्या परवानगीनंतर एक हजार मेगावॉट विजेची गरज भागवण्यात येईल, असे अपेक्षित आहे. दिवसापोटी 500 मेगावॉट, तर राऊंड द क्‍लॉक पद्धतीने 500 मेगावॉट विजेची गरज महावितरणला आहे. महावितरणने अल्प मुदतीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे 395 मेगावॉट विजेची खरेदी केली आहे. 

राज्य वीज नियामक आयोगाच्या धोरणानुसार महावितरणला युनिटमागे 3.79 रुपये ते 4 रुपये दराने वीज खरेदी करता येते; पण सर्व पर्यायांचा आणि स्रोतांचा वापर करूनही सरासरी हजार ते दीड हजार मेगावॉट इतका विजेचा तुटवडा आहे. त्यामुळेच महावितरणने भविष्यातील वीजटंचाई गृहीत धरून हा निर्णय घेतला आहे. आगामी रब्बी हंगाम, शेतीपंपासाठी वाढणारी विजेची मागणी आणि ऑक्‍टोबर हिट यामुळे सप्टेंबरअखेरीलाच विजेची मागणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. 

वसुली कशी होणार? 
एक्‍स्चेंजमधून वीज खरेदीसाठी महावितरणला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. हे पैसे उभे करण्याचे आव्हानही महावितरणसमोर आहे. आपत्कालीन परिस्थितीत खरेदी केलेली वीज म्हणून या पैशांच्या वसुलीसाठी कंपनीला पुन्हा एकदा आयोगाचा दरवाजा ठोठावावा लागेल. 

पवन ऊर्जेची मदत 
आणीबाणीच्या परिस्थितीत महावितरणच्या मदतीला पवन ऊर्जा मदतीला आली आहे. महावितरणने पवन ऊर्जा कंपन्यांशी 3500 मेगावॉट विजेसाठी करार केला आहे. या कंपन्यांकडून सलग दोन दिवस महावितरणला 700 मेगावॉट वीज मिळाली आहे. पवन ऊर्जा महागडी असल्याने महावितरण ती खरेदी करीत नाही. 

पाऊसही मदतीला 
राज्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे विजेच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे महावितरणला आज भारनियमन करावे लागले नाही. महावितरणची आजची विजेची मागणी 13 हजार मेगावॉट इतकी होती. महावितरणला काही दिवसांपासून मदत करणाऱ्या रतन इंडियाच्या विजेच्या पुरवठ्यातही आज कोळशामुळे घट झाली. 

Web Title: mumbai news electricity