चेंगराचेंगरीनंतरही एल्फिन्स्टनची परिस्थिती जैसे थे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

मुंबई - मुंबईतील एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पुलावर 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत 23 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एल्फिन्स्टनसह सर्व स्थानकांचे ऑडिट करण्यात आले. त्याचा अहवालही सादर करण्यात आला. अनेक कामांच्या घोषणाही करण्यात आल्या; मात्र महिना उलटला तरी अंमलबजावणी करण्यात न आल्याने परिस्थिती जैसे थे आहे. केवळ स्थानक परिसर आणि पुलांवरील फेरीवाले मात्र गायब झाले आहेत.

एल्फिन्स्टन-परळ स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर आणि तेथील तिकीट खिडकीजवळ वर्दळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. स्थानक आणि पुलावर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान नजर ठेवून असले, तरी प्रवासी संख्येपुढे ते दुर्बल ठरत आहेत. वर्दळीच्या वेळी आजही पुलावरून गर्दीतून वाट काढत प्रवासी परळ आणि एल्फिन्स्टन स्थानक गाठतात. नुकतीच प्रशासनाने या दुर्घटनाग्रस्त पुलाला रंगरंगोटी केली आहे. तेथील पत्रेही काढून टाकले आहेत, परंतु पुलाच्या रुंदीकरणाबाबत हालचाल झालेली नाही. नाही म्हणायला रेल्वे हद्दीतील फेरीवाले गायब झाले आहेत. स्थानकांबाहेरील फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केल्याने प्रवाशांना मोकळा श्‍वास घेता येत आहे. अंधेरी स्थानकाच्या मुख्य पुलावरील गर्दी कमी करू शकणारा पूर्वेकडील रिक्षा डेक अजूनही सुरू झालेला नाही. चर्चगेट स्थानकातील गर्दी त्वरेने बाहेर जावी यासाठी तेथील 70 फुटी रुंद गेट बंदच आहे.

पावसावर खापर
एल्फिन्स्टन दुर्घटनेला जबाबदार कोण? दुर्घटनेला कारणीभूत ठरणारी अफवा कोणी पसरवली असे अनेक प्रश्‍न या दुर्घटनेनंतर विचारले गेले. रेल्वे अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट देऊन पाऊस आणि अफवेमुळे दुर्घटना घडल्याचे चौकशी समितीच्या अहवालात नमूद केले आहे.

ऑडिट समितीच्या सूचना
पश्‍चिम-मध्य रेल्वेवर ऑडिट करण्यासाठी 13 गटांतील सदस्यांनी सात दिवस पाहणी करून अंतिम अहवाल गेल्या सोमवारी महाव्यवस्थापकांकडे दिला. त्यात एल्फिन्स्टन स्थानकातील तिकीट आरक्षण केंद्र अन्यत्र हलवावे, पुलांचे रुंदणीकरण करावे, परळ टर्मिनस त्वरित जलदगतीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. परळच्या फलाट क्रमांक एक आणि दोनवरून एल्फिन्स्टन रोडला जाणाऱ्या पादचारी पुलाला समांतर स्कायवॉक बांधून त्यातील एक भाग फलाटाकडे नेण्याची सूचना करण्यात आली आहे. पश्‍चिमेकडील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याची आणि दादरच्या दिशेने स्कायवॉक बांधण्याची सूचनाही अहवालात करण्यात आली आहे.

ऑडिट समितीने पाच पादचारी पूल बांधण्याची आणि एल्फिन्स्टनसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी सर्व स्थानकांवर 1,600 अत्याधुनिक व्हिडीओ अनॅलिटिकल सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याची शिफारस केली आहे. फलाटावरील उपाहारगृहे आणि स्वच्छतागृहे स्थानक परिसरातील अन्य सार्वजनिक ठिकाणी स्थलांतरित करून रेल्वे परिसर मोकळा करावा, असेही सुचवले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी होमगार्ड, रेल्वे मदतनीस बटालियन फौज तयार करण्याची सूचनाही अहवालात आहे.

एल्फिन्स्टन रोडवर स्कायवॉक
एल्फिन्स्टन स्थानकातील अपघातग्रस्त अरुंद पादचारी पुलाच्या जागी नवा 12 मीटर पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. त्याच्या उत्तरेकडील टोकाला स्कायवॉक बांधण्यात येणार आहे.

घाव न भरणारे
चेंगराचेंगरीत कोणी आपली मुलगी, कोणी आई, कोणी भाऊ तर कोणी पती गमावला. अनेकांनी तर ही दुर्घटना अनुभवली. अनेकांच्या मनातील घाव अजून ताजे आहेत. पश्‍चिम रेल्वेने 34 जखमींना आणि 23 मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई दिली; मात्र आमची गेलेली माणसं परत येतील का? 10 लाखांची मदत आम्हाला किती दिवस पुरणार? हे नातलगांचे प्रश्‍न सर्वांनाच निरुत्तर करतात.

फेरीवाले कळीचा मुद्दा
रेल्वे स्टेशनचा परिसर, रेल्वे पूल आणि भुयारी मार्गांमध्ये फेरीवाल्यांनी बस्तान बसवले होते. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाले हटवा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला होता. फेरीवाल्यांना न हटवल्याने मनसेने आंदोलनही केले. आता रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक पोलिसांनीही रेल्वे स्थानक परिसरातील, पुलावरील फेरीवाल्यांना हुसकावून लावले आहे.

महिना उलटला तरी सरकारला जाग आली नाही. दुर्घटनास्थळाची परिस्थिती बदललेली नाही. रेल्वे आणखी काही प्रवाशांच्या मरणाची वाट पाहत आहे.
- वंदना सोनावणे, महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा

दुर्घटना टाळण्यासाठी विशेष मुंबई लोकल झोन आवश्‍यक आहे. बुलेट ट्रेनऐवजी उन्नत मार्ग बांधायला हवा. आणखी काही स्थानके सुरू करावीत.
- नंदकिशोर देशमुख, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघ

उपाययोजना
पश्‍चिम रेल्वे

- सर्व स्थानकांत उच्च क्षमतेचे सीसी टीव्ही बसवणार
- पादचारी पुलांसाठी 245 कोटींची तरतूद
- महिलांच्या डब्यात "टॉकबॅक' यंत्रणा 15 महिन्यांत सुरू करणार
- पादचारी पुलांवर दिशादर्शक फलक लावणार
- पादचारी पुलांवरील वाय-फाय सेवा बंद
- आणखी पादचारी पूल उभारणार
- स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई
- एल्फिन्स्टन ते परळ स्थानकाला जोडणारा पूल उभारणार

मध्य रेल्वे
- पादचारी पुलांचा समावेश स्थानकावरील अनिवार्य बाबींमध्ये
- रेल्वे महाव्यवस्थापकांना 18 महिन्यांसाठी प्रवासी सुरक्षेचा विशेषाधिकार
- 16 ठिकाणी पादचारी पूल बांधणार
- परळ टर्मिनसच्या कामाला गती

Web Title: mumbai news elphinstone railway bridge condition