"काळ दिवस'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत 22 मृत्युमुखी, 35 जखमी
मुंबई - मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी सेवेच्या इतिहासात शुक्रवार "काळ दिवस' ठरला. पश्‍चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावर सकाळी पावणेअकरा वाजता चेंगराचेंगरी होऊन 22 प्रवाशांचा जीव गेला, तर 35 जण जखमी झाले.

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत 22 मृत्युमुखी, 35 जखमी
मुंबई - मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी सेवेच्या इतिहासात शुक्रवार "काळ दिवस' ठरला. पश्‍चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावर सकाळी पावणेअकरा वाजता चेंगराचेंगरी होऊन 22 प्रवाशांचा जीव गेला, तर 35 जण जखमी झाले.

चेंगराचेंगरीनंतरचे दृश्‍य मानवी भावना थिजवून टाकणारे होते. निष्प्राण झालेल्या 22 जणांची कलेवरे आणि असह्य वेदनेने विव्हळणारे जखमी प्रवासी हे दृश्‍य काळजाला खरे पाडणारे होते. दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशांचे आक्रोश अश्रूंच्या रूपात ओघळत होते. नेमके काय घडले? कसे घडले, हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे शब्दच उरले नव्हते. बचावल्याने सुटकेचा निःश्‍वास सोडावा की मृत्युमुखी पडलेल्या आपल्या सहप्रवाशांबद्दल दुःख व्यक्त करावे, याचा सारासार विचार करण्याची शक्तीच ते काही काळ गमावून बसले होते. ज्या पुलाशी त्यांचे वर्षानुवर्षांचे नाते होते, त्याच पुलावर आज काळाने झडप घातली होती.

नेमके काय झाले?
चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली हे कुणालाही निश्‍चित सांगता येत नाही; परंतु काही प्रवासी घसरून पडल्यामुळे अफवा पसरल्या. शॉर्टसर्किट झाले, पूल कोसळला, पत्रा पडला, असा आरडाओरडा ऐकू आला आणि प्रत्येक जण जीव वाचविण्यासाठी धावला. या जीवघेण्या धावपळीत चेंगराचेंगरी झाली.

एल्फिन्स्टन स्थानकाच्या उत्तरेकडील हा पूल जेमतेम सहा फूट रुंद आहे. पावसाची रिपरिप होती. त्यामुळे अनेक प्रवासी पुलावरच उभे होते. त्याचवेळी दोन्ही स्थानकांवर गाड्या आल्या. त्यांतून बाहेर पडलेले प्रवासी नेहमीच्या सवयीने पुलाकडे धावले. रेटारेटी सुरू झाली. प्रत्येकाला आपल्या कार्यालयाची, कामाची वेळ गाठायची घाई होती. बाहेर पडण्यासाठी रेटा वाढला. त्यात काही प्रवासी घसरून पडले. त्यांच्या अंगावर मागे असलेले प्रवासी पडले. एकच गोंधळ उडाला. पूल कोसळल्याची, शॉर्टसर्किट झाल्याची अफवा पसरली. जो तो जिवाच्या आकांताने पळू लागला. खाली पडलेल्या प्रवाशांच्या अंगावर पाय देऊन जीव वाचवू लागला. या धडपडीत काही जण कोसळले. त्यांचा श्‍वास गुदमरला, तर काहींच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. पुलाच्या पायऱ्यांवरील दृश्‍य विदारक होते. एकेका प्रवाशांच्या अंगावर तीन-तीन, चार-चार प्रवासी पडले होते.

नागरिक धावले मदतीला
चेंगराचेंगरीची माहिती मिळताच स्थानकाशेजारच्या चाळींतील नागरिक मदतीला धावले. अन्य प्रवासीही सरसावले; पण पुलावर शेकडो प्रवासी अडकून पडल्याने आणि पुलाच्या दोन्ही टोकांना प्रचंड गर्दी झाल्याने जखमींना बाहेर काढणे अशक्‍य झाले. काहींनी शिड्या लावून पुलाचे संरक्षक पत्रे तोडले आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींवर प्रथमोपचार करून केईएम रुग्णालयात पाठवले. मृतांपैकी 19 जणांची ओळख पटली आहे.

नवे पूलही कुचकामी
परळ आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकांशेजारच्या व्यापारी संकुलांमुळे प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन रोड स्थानकावर दोन नवे पूलही बांधण्यात आले; परंतु हे स्थानक अरुंद असल्याने नवा पूलही अरुंदच आहे. परळ स्थानकावरून बाहेर येण्यासाठी भायखळ्याच्या दिशेला एकच पूल आहे. तोही अरुंद असल्याने तेथे रेटारेटी होते. ती कमी करण्यासाठी दादरच्या दिशेला पूल बांधण्यात आला; परंतु तो टोकाला असल्याने त्याचा वापर कोणीही करीत नाही.

वारसांना पाच लाखांची मदत
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड आणि परळ स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलावर आज झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत आणि जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च सरकार करणार असून, या दुर्घटनेची राज्य सरकार आणि रेल्वे विभागाद्वारे सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. रेल्वे प्रशासनानेही मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

- मृतांच्या नातलगांना राज्य आणि केंद्राची प्रत्येकी पाच लाखांची मदत
- मुंबईतील चेंगराचेंगरीची पहिलीच दुर्घटना
- प्रवाशांची रेल्वेमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी
- बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

मुंबईतील चेंगराचेंगरीत बळी पडलेल्या लोकांबद्दल मी दु:ख व्यक्त करतो. जखमी लोक लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतो. सर्व प्रकारची मदत वेळेवर पोचावी यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर आज झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची राज्य सरकारने न्यायालयीन चौकशी करावी. रेल्वे स्थानकावर पूल कोसळला, अशी अफवा पसरविणाऱ्या लोकांविरुद्ध सरकारने कडक कारवाई करावी.
- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
Web Title: mumbai news elphinstone station stampede many dead injured