कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांना गुंड सुरेश पुजारीची धमकी

रविंद्र खरात 
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

सुमित चक्रवर्ती यांना देखील सुरेश पुजारीने धमकीचा फोन केला होता. या वेळी सुमित चक्रवर्ती यांच्या मुलाने फोन उचलत सुरेश पुजारीला सुनावले होते की "हिम्मत असेल तर समोर येऊन बोल" असाच प्रकार तत्कालीन राष्ट्रवादीचे नगरसेवक व आता टीम ओमी कलानी मध्ये असलेले नगरसेवकाच्या बाबतीत घडला होता. या नगरसेवकाने सुरेश पुजारी यास सुनावले होते की "तु मला ओळखत नसशील पण मी तुला ओळखतो' तू उल्हासनगर येथील मंदाताईच्या ढाब्या वर कामाला होतास"असे सांगत सुरेश पुजारीची इज्जत काढली होती

कल्याण -  ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा खंडणी मागण्याचे सत्र सुरू झाले असून कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नंतर आता कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गणपत गायकवाड यांना 15 आणि 17 नोव्हेंबर रोजी सुरेश पुजारी या गुंडाने धमकी देत 50 लाखाच्या खंडणीची मागणी केली आहे. खंडणी दिली नाही तर कुटुंबाला मारण्याची धमकी पुजारीने  दिली आहे. याबाबत पोलिसांना तक्रार करून ही माझी अथवा कुटुंबातील सदस्यांची विचारपूस पोलिसांनी केली नसल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे .

याबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी दिलेल्या माहिती नुसार 15 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर दुपारी 3 वाजून 8 मिनिटला +301 या क्रमांक वरून फोन आला . संभाषण पुढील प्रमाणे -  

सुरेश पुजारी - कोण बोलतोय 

आमदार गणपत गायकवाड - तुम्ही कोण बोलताय 

सुरेश पुजारी - मी गॅंगस्टार सुरेश पुजारी बोलतोय 

आमदार गणपत गायकवाड - बोल 

सुरेश पुजारी - काय बोलू तु बोल ? 

आमदार गणपत गायकवाड - तू फोन केलेला आहे 

सुरेश पुजारी - मला पेटी पाहिजेत 

आमदार गणपत गायकवाड - कसले 50 पेटी 

सुरेश पुजारी - भाई लोक कसले पैसे मागतात माहीत नाही का तुला ...

आमदार गणपत गायकवाड - कसले मागतात? 

सुरेश पुजारी - तुझा केबलचा धंदा वैगेरे व्यवसाय चालू आहे ना ? 50 पेटी दे, असे बोलून फोन कट केला ...

पुन्हा 3 वाजून 9 मिनिट आणि नंतर 3 वाजून 14 मिनिटला फोन आला आणि म्हणाला की तुला दोन दिवस देतो आणि फोन कट केला. याच प्रमाणे (शुक्रवार) ता. 17 रोजी ही फोन करून धमकी दिल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिसांनी दिली आहे . 

काही दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांना ही धमकी देण्यात आली होती ,ती घटना ताजी असताना आमदार गणपत गायकवाड यांना धमकी दिल्याने एकच खळबळ माजली आहे. 

सुरेश पुजारी कोण ? 

सुरेश पुजारी हा या उल्हासनगर येथील  विश्वास धाब्यावर पूर्वी कामाला होता. या नंतर तो घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज येथे राहात होता. येथूनच त्याने गुन्हेगारी सुरू केली होती. सध्या तो कुठे आहे पोलिसांनाही  माहीत नसल्याचे समजते . 

या पूर्वी उल्हासनगर 2 येथील सच्छिदानंद केबल व्यवसायिकावर त्याच्या शूटरने गोळ्या झाडल्याची घटना सीसीटीव्ही कैद झाली होती. सुमित चक्रवर्ती यांना देखील सुरेश पुजारीने धमकीचा फोन केला होता. या वेळी सुमित चक्रवर्ती यांच्या मुलाने फोन उचलत सुरेश पुजारीला सुनावले होते की "हिम्मत असेल तर समोर येऊन बोल" असाच प्रकार तत्कालीन राष्ट्रवादीचे नगरसेवक व आता टीम ओमी कलानी मध्ये असलेले नगरसेवकाच्या बाबतीत घडला होता. या नगरसेवकाने सुरेश पुजारी यास सुनावले होते की "तु मला ओळखत नसशील पण मी तुला ओळखतो' तू उल्हासनगर येथील मंदाताईच्या ढाब्या वर कामाला होतास"असे सांगत सुरेश पुजारीची इज्जत काढली होती.

सोशल मीडियावर चर्चा ...

ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या या खंडणी सत्रा बाबत सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल झाली असून एक वादग्रस्त पोलीस अधिकारी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकात आल्या वर हे खंडणी सत्र सुरू झाल्याचे यात म्हटले आहे.हा अधिकारी या पूर्वी निलंबित होता पणा आता तो कामा वर रुजू झाला आहे. या अधिकाऱ्याने अंडरवर्ल्ड शी संगनमत करून मोठी माया जमविल्याचा आरोप देखील या व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आला आहे. 

आमदार गणपत गायकवाड हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते असून त्यांनी जे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत ते खाते राज्याच्या मुख्यमंत्री कडे असून आता या प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष्य लागले आहे .

Web Title: mumbai news: extortion