फिफा संपले... बॅनर उरले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

नवी मुंबई - ज्युनियर फिफा विश्‍वचषक स्पर्धा संपली, तरी नवी मुंबई महापालिका मात्र या फिफा फिव्हरमधून बाहेर पडलेली दिसत नाही. फिफाचे सामने संपून दहा दिवस झाले, तरी महापालिकेने फिफाच्या वातावरण निर्मितीसाठी शहरात लावलेले बॅनर काढलेले नाहीत. एरवी बॅनर लावून शहर विद्रूप केल्याची ओरड करणाऱ्या पालिकेचा हा कारभार म्हणजे दिव्याखाली अंधार असा आहे.

आंतरराष्ट्रीय फिफा फुटबॉल स्पर्धेतील सामने नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार असल्याने महापालिकेला यजमानपद मिळाले होते. यजमानपदाला साजेसे असे सर्व सोपस्कार महापालिकेने पार पाडले. फिफाच्या जनजागृतीसाठीही महापालिकेने मोलाचा वाटा उचलून शहरात जाहिरात केली. फिफाच्या वातावरण निर्मितीसाठी शहरात महापालिकेच्या वतीने रस्त्यांच्या कडेला, विजेच्या खांबांवर, उड्डाणपुलांच्या कडेला, पाम बीच मार्गाच्या दुभाजकांवरील विजेच्या खांबांवर, रेल्वेच्या उड्डाणपुलांवर असे अनेक ठिकाणी मोठे बॅनर लावले. यात फिफाच्या स्पर्धेची माहिती दिली आहे. शहरात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसह इतर प्रेक्षकांचे स्वागत करणारे बॅनर आहेत; तर काही बॅनरवर भेट दिल्याबद्दल आभारही व्यक्त केले आहेत. नवी मुंबईत फिफाच्या सामन्यांमधील २५ ऑक्‍टोबरला झालेला उपांत्य सामना हा अखेरचा सामना होता. त्यानंतर २८ ऑक्‍टोबरला कोलकाता येथे अंतिम सामना झाला. मात्र आता दहा दिवस झाल्यानंतरही शहरात लावलेले फिफाचे बॅनर जैसे थे आहेत. शहरातील बेकायदा बॅनरमुळे होत असलेल्या विद्रूपीकरणावर आधीच उच्च न्यायालयाने कडक ताशेरे मारले आहेत. अशात खुद्द पालिकेला बॅनर उतरवण्याचा विसर पडल्याने नागरिकही आश्‍चर्य व्यक्त करत आहेत.  

नवी मुंबईत काही ठिकाणी लावलेले बॅनर काढण्यात आले आहेत. उर्वरित काही बॅनर लवकर काढण्यात येतील. तसे आदेश प्रशासनाला तत्काळ देण्यात येतील.
- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त.

Web Title: mumbai news fifa