अग्निसुरक्षा नियमांची राखरांगोळी

अग्निसुरक्षा नियमांची राखरांगोळी

उपाहारगृहे-पबमध्ये होतेय कायद्याची पायमल्ली 
फर्निचर लगेच पेटणारे नसावे 

गच्चीवरील उपाहारगृहांसाठी वापरण्यात येणारे फर्निचर सहज पेट घेईल असे नसावे. त्याच अटीवर उपाहारगृहांना परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ‘मोजोस’ आणि ‘वन अबाव्ह’मधील फर्निचरही जळाऊ असल्याचे आढळून आले. गच्चीवरील फ्लोअरिंगही जळाऊ साहित्याचे नसावे, असाही नियम आहे. मात्र, दोन्ही उपाहारगृहांमध्ये फ्लोअरिंगला कारपेट होते, असेही स्पष्ट झाले आहे.

सिलिंडर बाहेर असावेत 
उपाहारगृहातील सिलिंडर प्रामुख्याने इमारतीच्या बाहेरच्या बाजूला असावेत. पाईपमधून स्वयंपाकघरापर्यंत गॅस पुरवला जावा, असा नियम आहे. मात्र, अनेकदा सिलिंडर स्वयंपाकघरातच असतात. सिलिंडरच्या साठ्यानुसार कशा प्रकारची प्रतिबंधक यंत्रणा असावी याचेही नियम असतात. मात्र, आवश्‍यक अग्निप्रतिबंधक यंत्रणा उपलब्धच नसते. असल्यास ती हाताळण्याचे ज्ञान तेथे असलेल्या व्यक्तींना नसते.

अग्निप्रतिबंधक यंत्रणाही कुचकामी
मॉल वा बहुमजली इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा असणे बंधनकारक आहे. या यंत्रणेची चाचणी दर सहा महिन्यांनी करणे आवश्‍यक आहे. तसेच ही यंत्रणा वापरण्याचा अनुभव असलेले सुरक्षा रक्षक असणे बंधनकारक आहे. मात्र, यातील एकही नियम पाळला जात नाही. अनेक वेळा इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणाही योग्य पद्धतीने काम करत नाही.

क्षेत्रफळानुसार अग्निप्रतिबंधक यंत्र
उपाहारगृहाच्या क्षेत्रफळानुसार आग रोखू शकेल असे रासायनिक पावडरचे फायर एक्‍स्टिंग्युशर (अग्निप्रतिबंधक यंत्र) असणे बंधनकारक आहे. प्रत्येक १०० चौरस फुटासाठी नऊ किलोचे एक्‍स्टिंग्युशर असणे आवश्‍यक आहे. वेळोवेळी ते रिफील करून घेणे जरूरीचे आहे. मात्र, त्या निकषानुसार एक्‍स्टिंग्युशर अस्तित्वात नसतात. वेळोवेळी ते रिफील करून घेतले जात नाही. त्यामुळे आग विझवण्यासाठी त्यांचा वापरच होत नाही.

बंब फिरण्यासाठी हवी पुरेशी जागा 
इमारतीभोवती अग्निशमन दलाचा बंब फिरण्यासाठी पुरेशी जागा असणे बंधनकारक आहे. त्यानुसार इमारतीचा आराखडा मंजूर केला जातो. मात्र, इमारतीला ताबा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मोकळ्या जागेत अडथळे निर्माण केले जातात. तिथे अनेक वेळा बेकायदा बांधकाम केले जाते अथवा शेड उभारल्या जातात. त्यामुळे आगीच्या वेळी बंब पोहोचण्यास अडथळे येतात.

बेसमेंटचा गैरवापर 
बेसमेंटमध्ये पार्किंग असावे अथवा ते मोकळे असावे, असा नियम आहे. मात्र, प्रत्यक्षात बेसमेंटचा व्यावसायिक वापर केला जातो. तिथे अनेक वेळा गोडाऊन तयार केले जाते अथवा लहान-मोठे गाळे करून त्यात कार्यालये उभारली जातात.

स्वयंपाकघरात झोपायला बंदी
उपाहारगृह आणि खानावळीच्या स्वयंपाकघरात खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कामगारांना झोपायला देऊ नये, असा पालिकेचा नियम आहे. त्याच नियमावर परवानगी दिली जाते. मात्र साकीनाक्‍यातील फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत तो नियम पाळला गेला नाही. परिणामी १२ कामगारांना जीव गमवावा लागला. सिलिंडर, डिझेल, खाद्यतेल आदी ज्वलनशील साहित्याचा साठा असलेल्या कारखान्यात कामगार झोपत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पालिकेने त्याबाबतचा नियम सक्तीने पाळण्याचा निर्णय घेतला.

गच्चीवरील उपाहारगृहांमध्ये गॅस नको 
गच्चीवर उपाहारगृह चालवताना तिथे अन्न शिजवले जाऊ नये अथवा कोणत्याही ज्वलनशील साहित्याचा वापर होऊ नये असा नियम आहे. गच्चीवर कोणत्याही प्रकारचे छत असू नये, असाही नियम आहे. मात्र, कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस उपाहारगृहाला लागलेली आग म्हणजे या नियमांचे पालन न केल्याचा परिणाम आहे. हुक्‍क्‍याच्या जळालेल्या कोळशातून ठिणगी पडद्यावर पडल्यामुळे आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातच छतामुळे आग पसरत गेल्याचा दावा मुंबई अग्निशमन दलाने केला आहे.

‘एक्‍झिट’ मार्गात अडथळा 
बहुमजली इमारती, मॉल वा उपाहारगृहात आगीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र जिना असणे बंधनकारक आहे. या जिन्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये, असा नियम आहे. मात्र, अनेक वेळा या जिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार सामान आणून ठेवलेले असते. जिन्यांचा मार्गही अडवला जातो. ‘वन अबाव्ह’च्या जिन्यांमध्ये अडथळा असल्याने अडकलेल्यांना त्यातून बाहेर पडता आले नाही, असा दावा केला जात आहे.

अग्निसुरक्षेचे उपाय न करणाऱ्यांना याआधी नोटीस पाठवून त्यानंतर कायदेशीर कारवाई जात होती. मात्र, आता नोटीस न पाठवता पोलिसांच्या मदतीने उपाहारगृह थेट सील करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडून अग्निसुरक्षेचे उपाय पूर्ण करून घेण्यात येतील. अशा प्रकारच्या तपासणीसाठी ३४ अग्निशमन केंद्रांच्या पातळीवर स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहे. 
- अजोय मेहता  (आयुक्त, मुंबई महापालिका)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com