वांद्य्रात अग्निकल्लोळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

शंभर झोपड्या भस्मसात; कारवाई थांबवण्यासाठी आग लावल्याचा संशय

शंभर झोपड्या भस्मसात; कारवाई थांबवण्यासाठी आग लावल्याचा संशय
मुंबई - वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे लोहमार्गाला चिकटून असलेल्या गरीब नगर झोपडपट्टीत गुरुवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत किमान शंभर झोपड्या भस्मसात झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी 23 बंबांच्या मदतीने सायंकाळी 6च्या सुमारास आग नियंत्रणात आणली. या आगीत अग्निशामक दलाच्या एका जवानासह दोघे किरकोळ जखमी झाले. त्या परिसरातील बेकायदा बांधकामविरोधात पालिकेने सुरू केलेल्या कारवाईदरम्यान तेथे गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जाते. पालिकेची कारवाई थांबावी, या हेतूने ही आग मुद्दाम लावण्यात आली असावी, अशी शक्‍यताही वर्तवण्यात येत आहे.

परिसरातील छोटा दर्गा तसेच लाखो रुपयांचे साहित्य या आगीत भस्मसात झाले. झोपडपट्टीला लागून असलेल्या वांद्रे स्थानकातील तिकीट खिडकीलाही आगीची झळ बसली. चिकटून असलेल्या झोपड्यांवर चढवण्यात आलेले बेकायदा मजले, त्यात चालणारे बेकायदा कुटीरोद्योग, चिंचोळ्या जागेमुळे अशा प्रकारच्या आगी लागल्यास अग्निशामक दलाचे बंब तसेच रुग्णवाहिकांच्या वाहतुकीस येणारे अडथळे हे प्रश्‍न या घटनेमुळे पुन्हा ज्वलंत स्वरूपात पुढे आले.

वांद्रे येथील दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाच्या दिशेने जाणाऱ्या स्कायवॉकनजीकच्या तिकीट खिडकीलगतच्या छोट्या दर्ग्याजवळ गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जाते. रेल्वे स्थानकाच्या दिशेने पसरत गेलेल्या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. त्यात अनेक झोपड्या खाक झाल्या. या परिसरातील अनेक झोपड्या तीन मजली असून, बहुतांश घरांमध्ये शिलाईकाम चालते. तेथील कापड आणि झोपड्यांवरील प्लॅस्टिकमुळे आग पसरत गेली. अनेक घरांमधील सिलिंडरचेही स्फोटामुळे आग अधिकच फोफावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

रेल्वे वाहतुकीवर परिणाम
स्कायवॉकखाली मोठ्या प्रमाणावर बेकायदा स्टॉल्स, दुकाने व घरे आहेत. दुपारी 11.30च्या सुमारास पालिकेच्या पथकाने या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास सुरवात केली. त्यानंतर काही तासांतच ही आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने घाबरलेल्या रहिवाशांनी सामानसुमानासह रेल्वेमार्गावर धाव घेतली. त्यामुळे हार्बर मार्गावरील अंधेरी-सीएसटीएम दरम्यानची वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. एल्फिस्टन रोडस्थानकातील दुर्घटनेचा अनुभव आला असल्याने पोलिसांनी स्कायवॉकच्या दिशेने जाणाऱ्या पुलावर पादचाऱ्यांना प्रवेशबंदी केली होती.

तिकीटघराचे नुकसान
या आगीत वांद्रे स्थानकातील तिकीटघराचे मोठे नुकसान झाले आहे. तेथील फर्निचर, दिवे, पंखे तसेच संगणकांची आगीमुळे तसेच ती विझवण्यासाठी वापरलेल्या पाण्यामुळे हानी झाली आहे.

Web Title: mumbai news fire in vandre