मुंबईत गोळीबाराचा प्रयत्न फसला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

मुंबई - वांद्रे येथील सामाजिक कार्यकर्ती महिलेच्या हत्येच्या कटातील पंजाबचा शार्पशूटर जसबीर सिंग संतोष सिंग याला खंडणी विरोधी पथकाने ऍण्टॉप हिल येथून शनिवारी (ता. 27) अटक केली. सोशल मीडियावरून त्याला सुपारी देण्यात आली होती. 

मुंबई - वांद्रे येथील सामाजिक कार्यकर्ती महिलेच्या हत्येच्या कटातील पंजाबचा शार्पशूटर जसबीर सिंग संतोष सिंग याला खंडणी विरोधी पथकाने ऍण्टॉप हिल येथून शनिवारी (ता. 27) अटक केली. सोशल मीडियावरून त्याला सुपारी देण्यात आली होती. 

वांद्रे परिसरात एका नामांकित संस्थेच्या संचालिकेकडे अनेक दिवसांपासून दाऊद आणि छोटा शकीलचे हस्तक हरिष कुमार यादव, बिलाल कुतुबउद्धीन शमसी हे एक कोटीची खंडणी मागत होते. याबाबत नोव्हेंबरमध्ये पीडित महिलेने खार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. हा गुन्हा पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी हरिषकुमार यादव आणि बिलाल शमसी या आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीतून मुख्य सूत्रधार ललित शर्मा आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, छोटा शकील, फहीम मचमच, उस्मान चौधरी यांची नावे पुढे आली. ललित याने या हत्येची सुपारी पंजाबचा शार्पशूटर जसबीर सिंगला दिली होती. या प्रकरणात पुढे नाव येत असलेल्या फहीम मचमचच्या सत्यतेबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत. 

आरोपी हरिषने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचे ललितच्या पत्नीशी संबंध होते. त्यामुळे ललित आपल्याला वारंवार धमकावत होता. ललितच्या सांगण्यावरून आपण त्याच्या फोनवरून तक्रारदार महिलेस पैशासाठी धमकावल्याची कबुली हरिषने पोलिसांकडे दिली. या प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या हरिषला न्यायालयाने 17 जानेवारीपर्यंत; तर बिलाल शमसीला 23 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. बिलालच्या माहितीनुसार ललितने या हत्येची सुपारी जसबीर सिंग संतोष सिंगला दिली होती. मूळचा पंजाबच्या अमृतसरचा असलेला जसबीर हा सामाजिक कार्यकर्ती असलेल्या महिलेला मारण्यासाठी मुंबईत दाखल झाला होता. ललितने जसबीरची मुंबईच्या ऍण्टॉप हिल परिसरातील गुरुद्वारा परिसरात राहण्याची व्यवस्था केली होती. याची माहिती पोलिसांना वेळीच मिळाली. शनिवारी जसबीर ऍण्टॉप हिल येथे लपून बसल्याची माहिती शमसीने दिल्यानंतर पोलिसांनी जसबीरला अटक केली. 

सोशल मीडियावरून सुपारी 
जसबीरच्या चौकशीत तो फार पूर्वीपासून ललितच्या संपर्कात होता. तसेच ललितने त्या सामाजिक कार्यकर्तीची सुपारी जसबीरला सोशल मीडियावरून दिली होती. व्हॉट्‌सऍपवर ती महिला आणि तिच्या कारचे फोटो ललितने जसबीरला पाठवले होते. ललितच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये ही जसबीर आहे. दोघांमधील काही संशयास्पद संभाषणही पोलिसांच्या हाती लागले आहे. या हत्येसाठी जसबीरला काही लाख रुपये दिले जाणार होते. त्यानुसार त्या सामाजिक कार्यकर्ती महिलेवर जसबीर दोन दिवस पाळत ठेवून असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

Web Title: mumbai news firing crime