फ्लॅश चेकिंग ऑपरेशन रात्रीही 

मंगेश सौंदाळकर
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

फ्लॅश चेकिंगमध्ये दर आठवड्याला वेळा बदलत असतो. सुरक्षेच्या दृष्टीने फ्लॅश चेकिंग ऑपरेशन उपयुक्त ठरत आहे. गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. 
- निकेत कौशिक, आयुक्त, रेल्वे पोलिस 

मुंबई - रात्री लोकलमधून प्रवास करताना अचानक पोलिस आले तर तारांबळ उडू शकते; परंतु प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने रेल्वे पोलिसांनी "फ्लॅश चेकिंग ऑपरेशन' सुरू केले आहे. त्याचे परिणाम दिसू लागल्याने ती मोहीम आता रात्रीही राबवली जाणार आहे. नवरात्रोत्सव आणि दिवाळी सण जवळ आले असल्याने रात्रीची फ्लॅश चेकिंग मोहीम पोलिसांना उपयुक्त ठरणार आहे. 

शहरवासीयांची लाईफलाइन असलेल्या लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या सुरक्षेकरता रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिस (जीआरपी) विविध उपक्रम राबवत असतात. मुंबईतील रेल्वेस्थानक नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असतात. त्यातच समाजकंटकांकडून रेल्वेत बॉम्ब ठेवल्याच्या अफवांचे निनावी फोन केले जातात. त्याचा विचार करून रेल्वे पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेकरता कृती आराखडा तयार केला आहे. त्या आराखड्यानुसार रेल्वेस्थानकांत सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले. दुसरा भाग म्हणजे, फ्लॅश चेकिंग. तीनही रेल्वे मार्गांवर पाच पोलिसांची पथके तयार करण्यात आली. चेकिंगकरता मार्ग ठरवले गेले. फ्लॅश चेकिंगमध्ये अचानक पोलिस लोकलच्या डब्यात शिरतात. पोलिस येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गावरील लोकलच्या डब्याची तपासणी करतात. डब्यात विनातिकीट प्रवासी, समाजकंटक, रेकॉर्डवरचे आरोपी अथवा कोणी शस्त्र घेऊन प्रवास करत आहेत का, हे तपासले जाते. अचानक तपासणी होत असल्याने समाजकंटकांना आळा बसेल. ते लोकलमध्ये फारसे फिरकणार नाहीत. परिणामी, गुन्ह्याचे प्रमाण कमी होईल, अशा फ्लॅश चेकिंगमागचा उद्देश आहे. रेल्वे पोलिसांनी दीड महिन्यांपूर्वी फ्लॅश चेकिंग ऑपरेशला सुरुवात केली. दिवसा होणाऱ्या फ्लॅश चेकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी रेल्वेत चोरीचे प्रकार कमी होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. येत्या काळात नवरात्रोत्सव व दिवाळी सण असल्याने रात्रीच्या वेळचे फ्लॅश चेकिंग पोलिसांना उपयुक्त ठरणार आहे. फ्लॅश चेकिंगमध्ये बहुतांश बेवारस बॅगा मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे चित्र आहे. 

Web Title: mumbai news Flash checking operation