परदेशी पर्यटकांसाठी गणेशविसर्जन पाहण्याची सोय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई - सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यंदा प्रथमच पर्यटकांसाठी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन पाहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे आणि कोकणच्या गणेश दर्शनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने सहल काढण्यात येणार आहेत. 

मुंबईतील गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. गणेश विसर्जनावेळी गणेशभक्तांचा उत्साह, मोठमोठ्या मूर्ती, ढोल ताशांच्या मिरवणुका पाहण्यासाठी हजारो पर्यटक मुंबईत येतात. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण होत असल्याने एमटीडीसी आणि मुंबई महापालिका एकत्रितरीत्या परदेशी पर्यटकांसाठी प्रथमच गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन मिरवणुकीचा सोहळा पाहण्याची व्यवस्था करणार आहेत. 200 पर्यटकांना एकाच वेळी एक तासासाठी विसर्जन मिरवणूक पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सवाचे बदलत जाणारे रूपही दाखवले जाणार आहे. यासाठी एमटीडीसीच्या संकेतस्थळावरून बुकिंग करता येईल. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुंबई गणेश दर्शन सहलमध्ये लालबागचा राजा, गणेश गल्ली, जीएसबी मंडळ, फोर्टचा राजा, फणसवाडीचा गणपती, जितेकरवाडीचा गणपती, ब्राह्मणसभेचा गणपती; तर पुण्यासाठी शनिवारपाड्यापासून सहल सुरू होऊन कसबापेठ, तांबडी जोगेश्‍वरी, गुरुजी तालीम, दगडूशेठ, तुळशीबाग गणपतींचे दर्शन घडवले जाणार आहे. कोकण सहलीत दिवे आगार, हरिहरेश्‍वर येथील गणपतींचे दर्शन घडवण्यात येईल. 27 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत या सहली काढण्यात येणार आहेत. 

Web Title: mumbai news foreign tourists mtdc