गणेश मंदिरासाठी हजारो नागरिक रस्त्यावर  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

न्यायालयाच्या आदेशनुसार कल्याण पूर्वेतील गणेश मंदिर तोडण्यास गेलो; मात्र स्थानिकांनी विरोध करत महाआरती घेतली. गणेश विसर्जनापर्यंत कारवाई थांबली आहे. स्थानिक मंडळाने गणेश विसर्जनानंतर मंदिर स्थलांतरित करण्याचे लेखी दिले आहे. 
- भारत पवार, पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी 

कल्याण - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यात बाधित होणारी प्रार्थनास्थळे हटवण्याची मोहीम कल्याण-डोंबिवली महापालिकेने हाती घेतली आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळी कल्याण पूर्वेतील प्रसिद्ध गणेश मंदिर तोडण्यासाठी पालिका पथक पोलिस बंदोबस्तात गेले होते; मात्र हजारो नागरिकांच्या विरोधामुळे पथकाला परत फिरावे लागले. न्यायालयाचे आदेश असल्याने गणपती विसर्जनानंतर तेथील स्थानिक मंडळ गणपती मंदिर तेथून हलवणार आहे. 

कल्याण पूर्वेत कोळसेवाडीतील गणपती चौकात फार जुने गणेश मंदिर आहे. ते रस्त्यात येत असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार, पालिका कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्तासह आज सकाळी कारवाईसाठी गेले असता हजारो गणेशभक्तांनी कारवाईला विरोध केला. 

नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने पोलिसांनी स्थानिक मंडळ आणि पालिका अधिकाऱ्यांत मध्यस्थी केली. त्यानंतर गणेशोत्सवापर्यंत कारवाईला स्थगिती देण्यात आली. गणेशोत्सवानंतर स्थानिक मंडळ गणेश मंदिर पर्यायी जागेत स्थलांतरित करेल. त्याला पालिका मदत करेल, असे या वेळी ठरल्यामुळे जमाव शांत झाला. त्यानंतर नागरिकांनी गणेश मंदिरात महाआरती केली. 

Web Title: mumbai news ganesh mandir court kdmc