मानखुर्दच्या आगीत 60 गोदामे खाक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मुंबई - मानखुर्द मंडाले येथे रविवारी सकाळी लागलेल्या आगीत 50 ते 60 गोदामे खाक झाली आहेत. गोदामांमधील प्लॅस्टिक, ऑइल, लाकूड, भंगार सामानामुळे आग वेगाने पसरल्याने तब्बल चार तासांनी ती अटोक्‍यात आली. या बेकायदा गोदाममालकांवर महापालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी मुंबईतील झोपड्यांमध्ये सुरू असलेल्या बेकायदा उद्योगांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मंडाले येथील भंगार गोदामाला आज सकाळी 6 च्या सुमारास आग लागली. आजूबाजूला असलेल्या 50 ते 60 गोदामांमध्ये असलेली रसायने, प्लॅस्टिक, पाण्याच्या बाटल्या यांमुळे आग वेगाने पसरली. त्यात ही सर्व गोदामे खाक झाली. जेसीबीच्या साह्याने अग्निशमन दलाने आजूबाजूची गोदामे पाडल्याने आग पसरण्यास अटकाव झाला. त्यामुळे तब्बल चार तासांनी ही आग आटोक्‍यात आली. या गोदामांमध्ये काही ठिकाणी वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरचा साठा होता. सुदैवाने या सिलिंडरचा स्फोट झाला नाही. दरम्यान, आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, फेब्रुवारी-मार्च महिन्यांत विम्याचे पैसे मिळविण्यासाठी गोदामांना आगी लावल्या जातात, अशी माहिती स्थानिकांनी दिली; मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

Web Title: mumbai news godown fire loss

टॅग्स