सरकार धमक्‍यांना घाबरत नाही - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - शिवसेनेच्या धमक्‍यांना घाबरून अथवा त्यांनी भीती दाखवली म्हणून सरकारने कर्जमाफी दिली नाही, तर सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांना न्याय देण्याची होती म्हणूनच आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असल्याचा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी शिवसेनेला लगावला. सरकारने आपल्याला घाबरूनच कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा शिवसेनेने सोमवारी (ता. 13) केला असता पाटील यांनी त्यांचा दावा खोडून काढला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिवसेनेच्या भीतीला घाबरत नसल्याचेही स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी दहा हजार रुपयांची मागणी केल्याचे वृत्त पसरले. यावर बोलताना पाटील म्हणाले की, कर्जमाफीच्या प्रक्रियेला उशीर लागणार असल्याने दहा हजार रुपयांची तातडीची मदत देण्याचा निर्णय रविवारी (ता. 11) झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत घेण्यात आला होता. आजच्या बैठकीत रावते यांनी मुख्यमंत्र्यांना त्या निर्णयाची केवळ आठवण करून दिली, त्यांची मागणी नवीन नाही, असा पलटवार पाटील यांनी केला.

"सूर्य आमच्यामुळेच उगवतो'
कर्जमाफीचा निर्णय आमच्या दबावामुळेच झाल्याचा दावा शिवसेनेने केला होता. यावर बोलताना अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट म्हणाले, की निसर्ग नियमानुसार सूर्य हा उगवणारच असतो, मात्र तो आमच्यामुळेच उगवला, अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. ते म्हणाले, ""सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांचे म्हणणेही विचारात घेणार आहोत. तसेच विरोधी पक्ष नेत्यांची समिती बनवणार असून, ही समिती कर्जमाफीसाठीचे निकष ठरवेल. त्या निकषाप्रमाणे कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यातही एखाद्या शेतकऱ्याने जर पीककर्ज घेऊन मुदत ठेव इतर बॅंकांत केली असेल, तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही. तरीही सर्वानुमते आणि शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करूनच निकष ठरवले जातील.''

राज्य सरकार परिस्थितीला अनुसरून निर्णय घेत असते, कुणाच्या धमक्‍यांमुळे नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ज्या शेतकऱ्याची जमीन पाच एकरपेक्षा कमी आहे, त्यांना लगेच कर्जमाफी दिली जात असून, त्याचे परिपत्रक काढले जाणार असल्याचेही पाटील म्हणाले. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही, त्यांना आम्ही आवाहन करणार असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: mumbai news The government is not afraid of threats