कोणत्याही रेशन दुकानातून आता धान्य घ्या

किरण कारंडे
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मुंबई - राज्यातील शिधापत्रिका धारकांनाही लवकरच "पोर्टेबिलिटी'चा पर्याय वापरता येणार आहे. या पर्यायामुळे शिधापत्रिकेवर कोणत्याही शिधावाटप केंद्रावरून धान्य घेणे शक्‍य होईल. शिधापत्रिका - आधार जोडणीच्या मोहिमेमुळे ही "पोर्टेबिलिटी' शक्‍य होणार आहे.

मुंबई - राज्यातील शिधापत्रिका धारकांनाही लवकरच "पोर्टेबिलिटी'चा पर्याय वापरता येणार आहे. या पर्यायामुळे शिधापत्रिकेवर कोणत्याही शिधावाटप केंद्रावरून धान्य घेणे शक्‍य होईल. शिधापत्रिका - आधार जोडणीच्या मोहिमेमुळे ही "पोर्टेबिलिटी' शक्‍य होणार आहे.

"पोर्टेबिलिटीच्या प्रयोगाची सुरवात नागपूर शहरापासून झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत याठिकाणी "पोर्टेबिलिटी'चा पर्याय वापरण्यात आला आहे.

"आधार एनेबल पीडीएस' या यंत्रणेच्या माध्यमातून "पोर्टेबिलिटी'ची अंमलबजावणी करणे शक्‍य होत आहे. नॅशनल इन्फॉर्मेटिक्‍स सेंटरच्या (एनआयसी) माध्यमातून ए ईपीडीएसची सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. राज्यातील शंभर टक्के म्हणजे एक कोटी 48 लाख शिधापत्रिका आधारशी जोडल्यानंतर राज्यभरात हा पोर्टेबिलिटीचा पर्याय वापरला जाणार आहे.

शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्यावर अवलंबून असलेली लोकसंख्या सात कोटी 16 हजार इतकी आहे. तीन कोटी 80 लाख टन धान्य शिधापत्रिकेवर देण्यात येते. दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त भागातील तात्पुरत्या शिधापत्रिका असणाऱ्या ग्राहकांनाही हा पर्याय वापरता येईल. सध्या केवळ जिल्ह्यापुरताच "ए ईपीडीएस'चा पर्याय वापरता येत आहे. नागपूर शहरापाठोपाठ जालना, वाशीम आणि सोलापूर जिल्ह्यातही "ए ईपीडीएस'ची अंमलबजावणी झाली आहे. या ठिकाणी सध्या प्रायोगिक तत्त्वावर या पर्यायाचा वापर सुरू झाला आहे. या महिनाअखेरपर्यंत नांदेड, हिंगोली, कोल्हापूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांतही "ए ईपीडीएस'ची अंमलबजावणी होईल. उर्वरित जिल्हे मार्चअखेरपर्यंत जोडण्यात येतील.

टोकनचा पर्याय
शिधापत्रिका आधारशी लिंक नसलेल्या ग्राहकांना शिधा घेण्यासाठी योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यांची खातरजमा करून टोकन देण्यात येत आहे. मार्चअखेरपर्यंत शिधापत्रिका आधारशी जोडण्यासही सुचवण्यात आले आहे.

65 हजार शिधापत्रिकांना मालक नाही
नागपूर शहरात "ए ईपीडीएस'ची अंमलबजावणी गेल्या वर्षी ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत करण्यात आली होती. नागपुरातील 665 शिधावाटप केंद्रांवर दोन लाख 85 हजार शिधापत्रिका धारकांसाठी हा प्रयोग राबवण्यात आला; पण 65 हजार शिधापत्रिकाधारक तीन महिने शिधा घ्यायला आले नाहीत. त्यामुळे या शिधापत्रिका धारकांच्या गृहभेटी घेऊन खातरजमा करून त्यांना नोटीस देण्याचे, तसेच शिधापत्रिका रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिधापत्रिका धारकांनी धान्य घेतले नसल्याने प्रत्येक महिन्याला 4045 टन धान्याची बचत झाली आहे.

Web Title: mumbai news grain purchasing any ration shop