जीएसटी ही आपली आर्थिक ओळख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

चर्चासत्रात वस्तू व सेवा कर प्रणालीचे अनेकांनी स्वागत केले; तर काहींनी नाराजी व्यक्त केली. नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयातून सामान्य नागरिक कुठे सावरू लागलेला असतानाच जीएसटीचा आणखी एक झटका देण्यात आल्याचे अनेकांनी बोलून दाखवले. अनेक प्रश्नांची उत्तरे, तसेच समस्या व त्यावरील निवारण यावर या चर्चासत्रात भाष्य करण्यात आले

सायन - आर्थिक व्यवहारांची पोचपावती व त्याचा तपशील देणारा जीएसटी हा आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ती आपली आर्थिक ओळख बनणार आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. असीम दासगुप्ता यांनी व्यक्त केले. माटुंगा येथील "वी स्कूल' व स्कूल ऑफ सोशल सायन्स यांच्यातर्फे शनिवारी (ता. 14) वस्तू व सेवा कर या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

वस्तू व सेवा कर प्रणालीवर मार्गदर्शन करताना, तसेच त्याच्या अंमलबजावणीतील समस्या व आवश्‍यक दुरुस्त्याही त्यांनी सांगितल्या. 1978 पासून वस्तू व सेवा कर या प्रणालीची योजना सुचवण्यात आली असून, त्याची अंमलबजावणीही आता करण्यात आली आहे. वस्तू व सेवा कर प्रणालीत असलेला व्हॅल्यू ऍडेड टॅक्‍स कशा पद्धतीने आकारला जातो आणि तो ग्राहक, विक्रेते व कंपन्या यांच्यासाठी कशा प्रकारे उपयुक्त ठरेल याबद्दलची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

चर्चासत्रात वस्तू व सेवा कर प्रणालीचे अनेकांनी स्वागत केले; तर काहींनी नाराजी व्यक्त केली. नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयातून सामान्य नागरिक कुठे सावरू लागलेला असतानाच जीएसटीचा आणखी एक झटका देण्यात आल्याचे अनेकांनी बोलून दाखवले. अनेक प्रश्नांची उत्तरे, तसेच समस्या व त्यावरील निवारण यावर या चर्चासत्रात भाष्य करण्यात आले.

कार्यक्रमाला टाटा समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रा. जीवन मुखोपाध्याय, सनदी लेखापरीक्षक आशुतोष ठक्‍कर, वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे अधिष्ठाता कनू दोशी, स्कूल ऑफ सोशल सायन्सचे सेक्रेटरी डॉ. सुधीर परांजपे, वेलिंगकर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. उदय साळुंखे उपस्थित होते.

Web Title: mumbai news: gst business economy india