गुजराती व्यापाऱ्यांना संरक्षण हवे - संजय निरुपम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई - गुजराती भाषेत पाटी असल्याच्या कारणावरून मनसे कार्यकर्त्यांनी दुकानांची तोडफोड केल्याचा मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी निषेध केला. काल कांदिवली पश्‍चिम येथील एमजी रोडवरील "राजूभाई ढोकलावाला' या दुकानाच्या पाटीची मनसेकडून तोडफोड करण्यात आली होती. ही पाटी गुजराती भाषेमध्ये होती. मनसे कार्यकर्त्यांनी या विभागातील अनेक दुकानांवरील गुजराती पाट्यांना काळे फासले आणि तोडफोडही केली. यावर बोलताना संजय निरुपम म्हणाले, की मनसेच्या या गुंडागर्दीचा निषेध करतो. हा मार्ग चुकीचा आहे. याचा विरोध करत आहे.

मुंबईतील सर्व वर्गांना सरंक्षण मिळाले पाहिजे आणि ही सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालून हा प्रकार थांबवावा. मुंबईतील गुजराती व्यापाऱ्यांना संरक्षण मिळालेच पाहिजे. मनसे जातीयवाद निर्माण करत आहे. मनसेने याआधी उत्तर भारतीय आणि आत्ता गुजराती असा जातीय तेढ निर्माण करत आहे. हे त्वरित थांबले पाहिजे, असे निरुपम म्हणाले.

Web Title: mumbai news gujrathi businessman security sanjay nirupam