गुरुनाथ दळवी यांना जीवनगौरव पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

मुंबई - आर्किटेक्‍चर आणि इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या "सोसायटी इंटिरियर्स' या मासिकाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार-2018 मुंबईतील प्रख्यात आर्किटेक्‍ट गुरुनाथ दळवी यांना जाहीर झाला. पुरस्काराचे वितरण शनिवारी (ता. 24) हॉटेल ताज सांताक्रूझ, पूर्व येथे होणार आहे. तसेच मुंबई मराठी साहित्य संघाच्या विश्‍वस्तपदीही दळवी यांची नुकतीच निवड झाली आहे.

गेली 50 वर्षे दळवी यांनी आर्किटेक्‍चर, इंटिरियर डिझायनिंग व एक्‍झिबिशन डिझायनिंग या शैक्षणिक संस्थांमध्ये काम केले आहे, तर एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर, वांद्रे या संस्थेमध्ये सुमारे दोन दशके प्राचार्य-संचालक या पदांवर कार्यरत होते. कौन्सिल ऑफ आर्किटेक्‍चर, नवी दिल्ली या शिखर संस्थेचे चार वर्षे उपाध्यक्षही होते. मुंबई मराठी साहित्य संघाचे गेली दहा वर्षे ते उपाध्यक्ष आहेत. संस्थेवर विश्‍वस्त म्हणून त्यांची निवड केली आहे. नाट्य परिषदेची रोहा, वसई, नगर येथील नाट्य संमेलने; तर ठाणे, चिपळूण, चंद्रपूर येथील साहित्य संमेलने तसेच तिसऱ्या विश्‍व साहित्य संमेलनाचे सिंगापूर येथील आयोजनामध्ये दळवी यांची भूमिका महत्त्वाची होती.

Web Title: mumbai news gurunath dalavi jeevangaurav award