अपंग तरुणाला आठ मजले चढ-उतार करण्याची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

अपंगांनी कोठे दाद मागावी? 
इंग्लंडमधील हेट क्राईम संदर्भातील कायद्यानुसार वंश, धर्म, लिंग, तृतीयपंथीय आणि अपंगत्वाबाबत पूर्वग्रह किंवा वैर ठेवून केलेली कृत्ये गुन्हे ठरतात; परंतु आपल्याकडे अपंगांना अवमानकारक वागणूक देणाऱ्यावर कारवाईसाठी कायदा नाही, असे पुष्करचे वडील विनायक गुळगुळे यांनी सांगितले. अशा प्रकरणी पुण्यातील कमिशन ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी यांच्याकडे दिवाणी स्वरूपात दाद मागता येते, असेही ते म्हणाले.

मुंबई - सेलेब्रल पाल्सीने ग्रस्त असलेल्या एका अपंग तरुणाला गोरेगावातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी माणुसकीहीन वागणूक देऊन आठ मजले चढउतार करायला लावल्याचे प्रकरण उजेडात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुष्कर गुळगुळे असे तरुणाचे नाव असून झाल्या प्रकारामुळे अपंगांचे संरक्षण करणारा कायदा नसल्याची खंत त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. 

पुष्करच्या आजोबांच्या नावावर पांडुरंग वाडीतील एका इमारतीत घर आहे. त्यासंदर्भातील कामासाठी गुळगुळे कुटुंब रविवारी (ता. ८) तिथे गेले होते. पुष्कर एकटा घरात बसून होता तर गुळगुळे दाम्पत्य सोसायटीच्या अध्यक्षांच्या घरी गेले. त्यांची गाडी सोसायटीच्या आवारात ठेवल्याचे निमित्त करून सेक्रेटरींनी गुळगुळेंच्या घरी जाऊन पुष्करला दमदाटी केली आणि गाडी बाहेर ठेवण्यास फर्मावले. नियमानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थेत पाहुण्यांच्या गाड्यांसाठी काही जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. आपण अपंग असल्याने गाडी चालवू शकत नाही, असे सांगितल्यावर तुझ्या आईवडिलांना घेऊन ये, असे सेक्रेटरींनी फर्मावले. त्यामुळे ६५ टक्के अपंग असलेल्या पुष्करला त्या विंगचे चार मजले जिन्याने उतरून पुन्हा दुसऱ्या विंगचे चार मजले चढावे लागले. 

आई-वडील कोठे गेले, हे पुष्करला माहीत नसल्याने सेक्रेटरींनी त्याला खाली नेऊन सुरक्षा रक्षकाच्या खुर्चीत डांबून ठेवले. घर उघडे आहे, असे त्याने सांगूनही तुझे आई-वडील येत नाहीत तोपर्यंत हलू नकोस, असा दम देऊन सेक्रेटरी आपल्या घरी निघून गेले. नंतर त्याबाबत गुळगुळे दाम्पत्याने सेक्रेटरींना जाब विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. हादरलेले गुळगुळे कुटुंबीय वनराई पोलिस ठाण्यात गेले; मात्र तेथील अधिकाऱ्यानेही त्यांना अजिबात सहानुभूती न दाखवता कायद्यावर बोट ठेवले. अशा प्रकरणात पोलिस केस होत नाही. तुम्ही इमारतीच्या एजीएममध्ये चर्चा करून विषय मिटवा, असा सल्ला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी दिला. अखेर गुळगुळे कुटुंबीयांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश प्रधान यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले. 

 

Web Title: mumbai news handicap given inhuman punishment