फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाचा बोऱ्या 

फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाचा बोऱ्या 

कोपरखैरणे - महापालिकेने फेरीवाल्यांच्या सुरू केलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता. 3) गोंधळ उडाला. यात आधार कार्ड लिंकमध्ये अडचणी येत असल्याने आता आठ दिवसांनी पूर्ण तयारी करून पुन्हा सर्वेक्षण सुरू करण्याची सूचना परवाना विभागाने दिली आहे. त्यामुळे हे काम थांबवण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे. 

नवी मुंबईतील फेरीवाल्यांचे सोमवारपासून सर्वेक्षण सुरू झाले. या सर्वेक्षणासाठी नागपूर येथील खासगी संस्थेची निवड झाली आहे. या संस्थेच्या तरुणांनी टॅब घेऊन सर्वेक्षण सुरू केले; परंतु आधार लिंकसाठी त्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. कोणतीही पूर्वतयारी न करता हे काम सुरू केल्याने हा गोंधळ उडाला. त्यामुळे या अडचणींवर मात करण्यासाठी आणखी आठ दिवसांनी पूर्णतयारी करून हे काम सुरू करण्याचे निर्देश परवाना विभागाने दिले आहेत. न्यायालयाने दणका दिल्यावर मंडप परवानगी धोरण आणि फेरीवाला धोरण राबविण्यासाठी सर्वेक्षणाचे काम पालिकेने सुरू केले आहे. 

या सर्वेक्षणात फेरीवाल्यांची संख्या कमी किंवा वाढविण्यासाठी काही मंडळी सरसावली आहे. परवानाधारक फेरीवाल्यांची संख्या तीन हजार 28 असल्याने आता सर्वेक्षण करून अधिकृत आकडा जाहीर केला जाणार आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी आधार कार्ड लिंकसाठी आणलेले टॅब बंद पडल्याने सोमवारी सकाळीच गोंधळ उडाला. याची माहिती मिळाल्यावर एजन्सीच्या प्रमुखांनी सर्वेक्षणस्थळी धाव घेऊन तांत्रिक दोष शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली. यामुळे फेरीवाल्यांचा उद्रेक वाढल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला. शेवटी याचे खापर आधार कार्ड लिंकवर फोडून नुसती कागदपत्रे गोळा करून नंतर हा डाटा तयार करून पुन्हा सर्वेक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील आधार कार्ड केंद्रांवर अगोदरच गोंधळ सुरू आहे. अनेक केंद्रे बंद ठेवण्यात आली असल्याने या सर्वेक्षणामध्ये अडचणी येत आहेत, अशी माहिती परवाना विभागातील अधिकाऱ्याने दिली. 

संघटना आक्रमक 
फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात सुरू असलेल्या गोंधळावरून आता फेरीवाला संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. हॉकर्स युनियन, फेरीवाला कृती समिती, गणेश वेल्फेअर संघ, नेरूळ फेरीवाला संघटना अशा दहा प्रमुख संघटनांनी नवी मुंबई हॉकर्स फेडरेशन तयार केली आहे. या महासंघाने मंगळवारी (ता. 5) वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात फेरीवाल्यांचा मेळावा आयोजित करून पालिकेच्या विरोधात एल्गार पुकारण्याची तयारी सुरू केली आहे. 

11 डिसेंबरपासून नवी मुंबईतील फेरीवाले बेमुदत बंद आंदोलन करणार आहेत. याबाबत भूमिका ठरवण्यासाठी मंगळवारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात मनसेच्या फेरीवालाविरोधी आंदोलनावरही चर्चा केली जाणार आहे. 
- प्रफुल्ल म्हात्रे, अध्यक्ष, फेरीवाला फेडरेशन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com