आरोग्य परवाना आता ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

मुंबई - उपाहारगृहे, बेकरी, खाद्यपदार्थ विक्रेते, लॉज, पिठाची गिरणी, तेल-तूप विक्रेते यांसारख्या विविध 35 व्यवसायांसाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचा आरोग्य परवाना मिळविण्याची सर्व प्रक्रिया आता सुधारणांसह ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदारास 20 ते 30 दिवसांच्या आत आरोग्य परवाना मिळेल. शुल्क भरून आरोग्य परवान्याचे नूतनीकरण दर वर्षी करण्याऐवजी पाच वर्षांतून एकदाच करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

पालिकेच्या संकेतस्थळावर "न्यू बिझनेस ऍप्लिकेशन' येथे क्‍लिक केल्यास ऑनलाइन अर्ज भरता येईल. अर्जदाराला त्याचे "पॅन कार्ड' स्कॅन करून अपलोड करावे लागेल. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अटींची पूर्तता निर्धारित कालावधीत करावी लागेल. त्या पूर्ततेची तपासणी मुंबई अग्निाशमक दलामार्फत स्वतंत्रपणे केली जाईल; तसेच आरोग्य परवान्यातील अटींच्या पूर्ततेची तपासणी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत; तर जागेची तपासणी "इमारत व कारखाने' खात्यामार्फत केली जाईल. अर्जदारास आरोग्य परवान्याच्या संख्येनुसार प्रत्येक परवान्यासाठी प्रक्रिया शुल्क 200 रुपये निश्‍चित करण्यात आले आहे. ते ऑनलाइन भरण्याची व्यवस्था आहे, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. तीस दिवसांत प्रक्रिया पूर्ण न केल्यास अर्ज प्रक्रिया आपोआप रद्द होईल. ऑनलाइन आरोग्य परवाना प्रक्रियेत पाच वर्षांसाठी शुल्क भरण्याची सोय आहे. त्यामुळे दर वर्षी परवान्यासाठी शुल्क भरण्याची गरज नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

...तर परवाना रद्द
परवाना दिल्यानंतर कोणत्याही तपासणीदरम्यान जागा अग्निसुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे आढळल्यास परवाना तत्काळ रद्द होईल, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. पालिकेच्या सहायक आयुक्तांनी परवान्याला मान्यता दिली अथवा नाकारल्याची माहिती अर्जदाराला ई-मेलद्वारे कळवली जाणार आहे.

Web Title: mumbai news health permission online