खाकी वर्दीतला 'माणूस' मदतीसाठी धावला!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

दिवसभरात अडीच हजार कॉल; ट्‌विटरद्वारेही संपर्क

दिवसभरात अडीच हजार कॉल; ट्‌विटरद्वारेही संपर्क
मुंबई - घरातले गणेशोत्सव आणि कुटुंबीयांची काळजी न करता पोलिसांनी पावसामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. मंगळवारी (ता. 29) दिवसभरात पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सुमारे अडीच हजार नागरिकांनी कॉल करून मदत मागितली. याशिवाय अतिवृष्टीच्या वेळेत जगभरातील 70 लाख नागरिक मुंबई पोलिसांशी ट्‌विटर हॅंडलद्वारे संपर्कात होते.

मुंबईत धुवाधार पाऊस सुरू असताना नियंत्रण कक्षात 177 पोलिस अधिकारी - कर्मचारी तैनात होते. पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि उपायुक्त रश्‍मी करंदीकरही नियंत्रण कक्षातून मुंबईवर नजर ठेवून होते. मंगळवारी नियंत्रण कक्षात अडीच हजार कॉल आले. त्यातील एक हजार 590 कॉल मदतीसाठी होते; तर एक हजार 21 जणांनी रेल्वे, पाणी किती भरले, बस आदींबाबतची माहिती विचारली. त्यात 264 झाडे कोसळल्याच्या घटना आणि 90 शॉर्टसर्किट, 186 ठिकाणी खोळंबलेली वाहतूक, 116 भांडणे आदींसंदर्भात कॉल होते. याशिवाय सीसीटीव्हीद्वारे पाणी तुंबलेली ठिकाणे, झाडे कोसळण्याच्या घटनांबाबतची माहिती पालिका आणि अग्निशमन दलाला देण्यात आली.

वाहतूक पोलिसांचे तीन हजार अधिकारी-कर्मचारी बुधवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत वाहतुकीचे नियंत्रण करत होते. याशिवाय 15 महिला व एका कुटुंबातील चार जणांनाही पोलिसांनी आयुक्तालयात आसरा दिला. त्यांना पोलिसांनी जेवण आणि अल्पोपहारही दिला. मानखुर्द येथील शेल्टर होममध्येही पाणी शिरले होते. ट्रॉम्बे पोलिसांनी तेथील 100 मुलांना सुखरूप बाहेर काढले.

दहिसर येथे मदत
दहिसर येथील एमएचबी पोलिसांना तेथील पाटील चाळीत पाणी शिरल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी चाळीतील सुमारे 60 नागरिकांना तेथून सुरक्षित स्थळी हलविले. तसेच दहिसर गावठाण परिसरातील 30 जणांना सुखरूप हलविण्यात आले.

कुर्ल्यात रेल्वेतून 110 जण सुखरूप
रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने सायन-कुर्ला स्थानकांदरम्यान अनेक लोकल मंगळवारी अडकून होत्या. त्यातील 110 प्रवाशांना पोलिसांनी बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले.

आर्थर रोड तुरुंग जलमय
देशातील अतिसंवेदनशील अशा आर्थर रोड तुरुंगातही मंगळवारी पाणी शिरले. त्यामुळे तेथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली. तुरुंग प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तळमजल्यावरील सुमारे एक हजार कैद्यांना वरच्या मजल्यावरील बराकीत हलविले. तुरुंगातील तळमजल्यावरील जवळपास सर्व बराकींमध्ये पाणी शिरले होते, असे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news help by police