प्रमुख रेल्वेमार्गांवर हिरकणी कक्ष उभारावेत

प्रमुख रेल्वेमार्गांवर हिरकणी कक्ष उभारावेत

मुंबई - लहान बाळांना स्तनपान करता यावे, यासाठी मुंबईतील प्रमुख उपनगरी रेल्वेस्थानकांवर (बोरिवली, अंधेरी, दादर, कुर्ला, घाटकोपर इ.) हिरकणी कक्ष उभारावेत, अशी महिलांची मागणी असून, सध्या शहरात अस्तित्वात असलेल्या एसटी आगारांमधील हिरकणी कक्षांसंदर्भात काही सुधारणा करण्याची गरज आहे, अशीही सर्वसाधारण प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

एसटी स्थानकांवरील हिरकणी कक्षाबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सकाळ वृत्तपत्रसमूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या सदस्यांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणी याबाबत पाहणी केली. शहरातील परळ, मुंबई सेंट्रल, कुर्ला, बोरिवली या एसटी स्थानकांवर हिरकणी कक्ष आहेत. मात्र त्यातही थोड्या सुधारणा करण्याची गरज आहे, खुर्च्या दाराकडे पाठ करून ठेवायला हव्यात, तर अन्यत्र स्वच्छतेबाबत थोडे लक्ष दिले पाहिजे, असे पाहणीत आढळून आले. 

खच्चून भरलेल्या उपनगरी गाडीत घामाघूम झालेले जोडपे कशीबशी जागा मिळवून बसलेले असताना अचानक त्यांच्या हातातील बाळ जोरजोरात रडायला लागते. त्याला भूक लागलेली असते हे आईला कळते; पण एवढ्या गर्दीत ती काहीच करू शकत नाही. गाडीत तोबा गर्दी असल्याने येणाऱ्या स्थानकावर उतरून बाळाला पाजावे म्हटले तर तेथेही उघड्यावरच बाळाची भूक भागवावी लागणार असते. त्यामुळे शक्‍य असेल, तर आपल्या तान्हुल्यासाठी या आया अशाच गर्दीत बाळाला पदराखाली घेतात. हे दृश्‍य आपल्याला कधीतरी कोठे तरी पहायला मिळतेच. एवढ्या लहानग्यांसह प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या अगदी फार मोठी नसते; पण एकाही महिलेला अशी गरज लागली, तर तिची सोय व्हावी आणि बाळालाही पोटभर दूध मिळावे, यासाठी असे हिरकणी कक्ष मोठ्या स्थानकांवर उभारावेत. बोरिवली, अंधेरी, वांद्रे, कुर्ला, घाटकोपर अशा ठिकाणी गाडी बदलण्यासाठी प्रवासी उतरतात, निदान अशा मोठ्या स्थानकांवर तरी हिरकणी कक्ष उभारावेत, अशी मागणी केली जात आहे. प्रथमा शिरोडकर, पारुल कांबळी, शोभा चांदूरकर, पूर्णिमा भोसले, शालिनी घाग, मीनाक्षी पटनायक या तनिष्कांना पाहणीत आढळलेली परिस्थिती........

मुंबई सेंट्रल
कक्ष कुलूपबंद आहे. मागणी केल्यास उघडून मिळतो. कक्षाबाहेर पाटीही आहे. आत दिवे, पंखे आहेत; पण आतमध्ये सफाई नीट नसते, उद्‌घोषणा होत नाहीत.

परळ - पाटीवर लापता...
कक्ष कुलुपबंद असतो. मागणी केल्यास पाच मिनिटांत तो उघडण्यात येतो. हा कक्ष कोठे आहे, हे दर्शविणारी ठळक पाटी तेथे नाही, आहे त्या कागदी पाटीवर कोणी तरी बेपत्ता व्यक्तीची जाहिरात चिकटवली आहे. आतमध्ये भरपूर सामान असले तरी चार पाच खुर्च्या, ट्युब, पंखे अशी चांगली व्यवस्था तेथे आहे; मात्र हिरकणी कक्षाबाबत तेथे ध्वनिवर्धकावरून सतत उद्‌घोषणा होणे आवश्‍यक आहे.  

कुर्ला-नेहरूनगर कामगारांनी व्यापला
हिरकणी कक्ष मोठा आणि व्यवस्थित आहे, त्याच्याबाहेर ठळक अक्षरात तसे लिहिलेही आहे. सध्या आगाराचे नूतनीकरण सुरू असल्याने हा कक्ष कामगारांनीच व्यापला आहे; पण काम संपल्यावर तो महिलांना वापरायला मिळेल, असे आगाराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बोरिवली नॅन्सी कॉलनीत पाटी नाही
कक्ष कुलूपबंद; पण तेथे बाहेर तशी पाटी नव्हती. 
बोरिवली सुकुरवाडीत धुळीचे राज्य
रेल्वे स्थानकाजवळच्या या एसटी स्थानकात हिरकणी कक्ष आहे, बाहेर पाटीही आहे; पण आतमध्ये सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते.

सिद्धिविनायकचा कक्ष छोटा
प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराने देवळासमोरच असा कक्ष उभारला आहे. त्यात खुर्ची, पंखा व दिवा आहे; मात्र हा कक्ष जेमतेम एक स्त्री बसू शकेल एवढा छोटा आहे, त्यामुळे तो मोठा करावा किंवा असे दोन-तीन कक्ष तेथे असावेत, अशीही मागणी आहे.  

प्रमुख स्थानकांवर कक्ष उभारा
रेल्वेचा वापर रोज लाखो प्रवासी करतात. सुटीच्या दिवशी तर अनेक कुटुंबे उपनगरी रेल्वेने जातात. त्यामुळे अगदी सर्व स्थानकांवर नाही, तरी प्रमुख स्थानकांवर असे हिरकणी कक्ष उभारावेत, अशी महिलांची मागणी आहे. यासाठी स्थानकांवर पक्के बांधकाम करण्याचीही गरज नाही. स्थानकांवर अनेक ठिकाणी बसण्याची व्यवस्था असतेच. त्याच्याभोवती तात्पुरते आडोसे तयार करूनही चालू शकेल किंवा मोठ्या पुलांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण असते, तेथेही या कक्षांसाठी जागा देता येईल, अशीही सूचना आहे. 

सीएसटी, वांद्रे टर्मिनस, कुर्ला टर्मिनस व मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानक येथे महिला वेटिंग रूममध्ये ही सोय मिळू शकते. 

दादर
दादर येथे मध्य रेल्वे मार्गावर महिलांच्या वेटिंग रूममध्ये महिलांसाठी ही सोय उपलब्ध आहे. पहिल्या दर्जाचे वेटिंग रूम चांगल्या अवस्थेत आहे; मात्र दुसऱ्या दर्जाच्या वेटिंग रूममध्ये अस्वच्छता भरपूर आहे. पश्‍चिम रेल्वेमार्गावरूनही अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात; मात्र तेथे वेटिंग रूम नसल्याने हिरकणी कक्षच नाही. वास्तविक दादर हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक असल्याने येथे या कक्षाची सर्वाधिक गरज आहे. 

अपर्णा मोहिते: महिलांना गर्दीच्या वेळी तारेवरची कसरत करून आपल्या मुलांना दूध पाजावे लागते. त्यातच महिलांवर होणारे अत्याचार या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तान्ह्या मुलांसाठी व त्यांच्या आयांसाठी प्रत्येक रेल्वेस्थानकावर हिरकणी कक्ष असणे आवश्‍यक आहे.

दिव्या मिश्रा : प्रत्येक बस डेपो आणि रेल्वे स्टेशनवर हिरकणी कक्ष असणे खूपच गरजेचे असून यामुळे महिलांना लहान मुलांना दूध पाजणे सोपे होईल. एसटीने अशी व्यवस्था करून महिलांना खूप चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

मनाली राणे : प्रवासादरम्यान लहान मुलांना कसे दूध पाजायचे हा खूप मोठा प्रश्न महिलांना पडतो. बस डेपो किंवा रेल्वेस्थानकांवर महिला दूध पाजण्यास अवघडतात. त्यामुळे हिरकणी कक्ष महिलांसाठी गरजेची सुविधा असून ही व्यवस्था सर्व ठिकाणी व्हावी. 

रिवा मोरे - लहान मूल सोबत असताना प्रवास करणे तसेही जिकिरीचे असतेच; पण त्यापेक्षा त्यांना दूध कुठे पाजायचे, याची चिंता प्रत्येक आईला सतावत असते. विशेषत- लांबच्या प्रवासा वेळी तर खूपच त्रास होतो. त्यामुळे हा उपक्रम स्तुत्य आहे. प्रत्येक रेल्वेस्थानक पर्यटनस्थळ तसेच गर्दीच्या ठिकाणी उदा. रुग्णालय येथेही हा कक्ष हवाच. 

सुजाता सुर्वे : पुणे-मुंबई असा प्रवास मी बऱ्याच वेळा केला आहे; पण जेव्हा माझा लहान मुलगा माझ्यासोबत होता तेव्हा मात्र प्रवास करणे खूपच तापदायक होते. दूध पाजण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने काहीच सुचत नसे. जेव्हा मला हा उपक्रम समजला तेव्हा मला खूपच आनंद झाला. त्यामुळे महिला आणि त्यांच्या तान्ह्या बालकांचा प्रवास सुखी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com