'कृष्णकुंज'जवळ हॉकर्स झोन हे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले "कृष्णकुंज' व पक्षाचे मुख्यालय असलेल्या "राजगड' परिसरातील काही रस्त्यांवर हॉकर्स झोन करण्याच्या पालिकेच्या निर्णयामुळे मनसेचे नेते संतप्त झाले आहेत. मनसेची बेकायदा फेरीवाल्यांविरोधातील मोहीम हाणून पाडण्यासाठी सत्तारूढ पक्ष व पालिकेतील अधिकारी अशाप्रकारे नको ते फाटे फोडत आहेत, अशी टीका पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली.

'प्रत्यक्षात "कृष्णकुंज' परिसरातील रस्ते लांबलचक असून, तेथे जेमतेम दहा फेरीवाल्यांना बसण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. ते नेमके कुठे बसतील, हे पाहावे लागेल. हा फारसा मोठा मुद्दा नाही; पण "राजगड'समोरील पद्माबाई ठक्कर मार्गावर शंभर फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार केला आहे. हा उच्चभ्रूंचा परिसर असून तेथे फेरीवाले आलेले नागरिकही सहन करणार नाहीत. पालिकेच्या निर्णयाविरोधात या नागरिकांनी न्यायालयात जावे. फेरीवाल्यांचा मूळ प्रश्‍न प्रलंबित राहावा, या हेतूनेच असले प्रकार होत असल्याचा संशय आहे,'' असे किल्लेदार म्हणाले.

Web Title: mumbai news hockers zone near krishnakunj