‘कागदी घोड्यां’मुळे खासगी घोडे बेलगाम

‘कागदी घोड्यां’मुळे खासगी घोडे बेलगाम

बेकायदा घोडागाड्यांवर कारवाई
मुंबादेवी -  घोड्यावरून पडून एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्यावर आज खडबडून जागे झालेल्या महापालिकेने घोडागाड्यांवर आणि बग्ग्यांवर कारवाई सुरू केली; तर अनेक घोडेवाल्यांनी आज घोडे तबेल्यातून बाहेर न आणल्याने कूपरेज परिसरात शुकशुकाट होता.

पालिकेचे सहायक आयुक्त उदयकुमार शिरूरकर आणि अभियंता अतुल कोल्हे यांनी पथकासह कारवाई करून दक्षिण मुंबईत रस्त्यावर बेकायदा व्यवसाय करणाऱ्या घोडागाड्या, रथ ताब्यात घेतले. पी’डिमेलो रोड येथे कारवाईदरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या घोडागाड्या आणि रथ आढळले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. काही बेकायदा गाड्या, रथ जप्त केले; तर काही गाड्या तोडून नष्ट केल्या.

रस्तादुरुस्तीची मागणी
घोडे ज्या मार्गिकेवरून बागेला फेरी मारतात, त्याची दुरवस्था  झाली आहे. त्याच्या दुरुस्तीची मागणी वारंवार करण्यात आली होती. स्थानिक नगरसेवकानेही तसे आश्‍वासन दिले होते; मात्र पुढे काहीही हालचाली झाल्या नाहीत, अशी माहिती घोडे व्यावसायिक कैलास जैसवाल यांनी दिली.

वर्षभरात २५ घोडागाड्यांवर  कारवाईचा पोलिसांचा दावा
मुंबई - कुलाबा येथे सहा वर्षांच्या मुलीचा घोडागाडीतून पडून मृत्यू झाल्यामुळे चौपाट्यांवर धावणारे घोडे आणि घोडागाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी वर्षभरात २५ घोडागाड्यांवर कारवाई केली.

मरिन ड्राईव्ह आणि गेट वे ऑफ इंडिया परिसरातील घोडागाड्या पोलिसांनी प्राणी अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार जप्त केल्या आहेत. अशक्त घोड्यांना उपचारांसाठी परळ येथील बैल-घोडा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. घोडागाडीत क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींना बसवून घोड्यांचा शारीरिक छळ केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (परिमंडळ-१) मनोजकुमार शर्मा यांनी दिली. या वर्षभरात साधारण २५ घोडागाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिसरात एकही घोडागाडी धावत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘पेटा’ या प्राणिमित्र संघटनेने मुंबईतील घोड्यांच्या छळवणुकीचा अभ्यास केला होता. त्यात घोडागाड्यांकडे १९२०च्या बॉम्बे सार्वजनिक वाहतूक कायद्यानुसार आवश्‍यक असलेले परवाने नसल्याचे आणि घोड्यांच्या तबेल्यांकडेही परवाने नसल्याचे आढळले. याप्रकरणी ॲनिमल्स ॲण्ड बर्डस चॅरिटेबल ट्रस्टने २०११ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने घोडागाड्यांवर बंदी घालण्याचे आदेश मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com